‘भोगावती’ अध्यक्षपदी पी. एन. पाटील निश्चित
By admin | Published: May 8, 2017 01:04 AM2017-05-08T01:04:24+5:302017-05-08T01:04:24+5:30
‘भोगावती’ अध्यक्षपदी पी. एन. पाटील निश्चित
लोकमत न्यूज नेटवर्क
राशिवडे : भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदासाठी माजी आमदार पी. एन. पाटील यांचे नाव निश्चित मानले जात असले, तरी उपाध्यक्षपदी कोण याचीच चर्चा भोगावती परिसरात सुरू आहे. उद्या, मंगळवारी ‘भोगावती’च्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांची निवड होत आहे.
भोगावती कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तांतर झाले. संचालक मंडळाच्या सर्व एकवीस जागा मोठ्या मताधिक्याने जिंकून काँग्रेसप्रणीत राजर्षी शाहू शेतकरी सेवा पॅनेलने वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे राष्ट्रवादी, शेकाप, शिवसेना, भाजप, जनता दल, स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्र महाआघाडीस सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. साहजिकच विजयी पॅनेलचे नेतृत्व करणारे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर यांच्यावर सभासद शेतकऱ्यांनी मोठा विश्वास टाकला आहे. त्यामुळे ‘भोगावती’च्या नूतन अध्यक्षपदी त्यांचे नाव निश्चित मानले जाते. मात्र, उपाध्यक्षपदी कोण याचीच भोगावती परिसरात चर्चा चालू आहे.
संभाव्य उपाध्यक्ष पदासाठी अनुभवी संचालकांची नियुक्ती होणार की, नवीन चेहऱ्याला पसंती मिळणार, याविषयी कमालीची उत्सुकता आहे. एकीकडे भोगावती वाचविण्याचे शिवधनुष्य पेलण्यासाठी अनुभवाला प्राधान्य मिळणार की नवीन कार्यकर्ता तयार करणार, याकडे परिसराचे लक्ष लागून राहिले आहे.
कर्जाच्या खाईत रुतलेल्या भोगावतीला पुन्हा गतवैभव मिळवून देण्याचे शिवधनुष्य या संचालक मंडळास पेलावे लागणार आहे. त्यामुळे पी. एन. पाटील यांना वेळ देणाऱ्या सहकाऱ्याची निवड करावी लागणार आहे.
सहकारातील जाणते नेतृत्व म्हणून आताच्या संचालक मंडळात आठ संचालक आहेत, तर उर्वरित संचालकांपैकी अनेकांनी आपल्या संस्था चांगल्या चालवून परिसरात आदर्श निर्माण केला आहे. याबरोबर या संचालक मंडळात नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याने सभासदांनीही आपल्या मताचे दान पी. एन. पाटील यांच्याच पदरात टाकले. अध्यक्षपदासाठी पी. एन. पाटील हेच दावेदार असून, उपाध्यक्ष पदासाठी नूतन संचालक मंडळातील ए. डी. पाटील- गुडाळ, ए. डी. चौगले - शिरगाव यांच्या नावाची चर्चा असून, ए. डी. चौगले यांचे नाव निश्चित मानले जात आहे.