‘पी. डी.’, सरनोबतांकडे एवढी प्रॉपर्टी आली कोठून?
By admin | Published: September 23, 2015 12:55 AM2015-09-23T00:55:20+5:302015-09-23T00:59:27+5:30
मानसिंगराव जाधव यांचा सवाल : आमच्या हेतूवर शंका घेण्यापेक्षा त्यांचा कारभार आठवावा
राजाराम लोंढे -कोल्हापूर ==शेतकरी संघाच्या निवडणुकीत सत्तारूढ पॅनेलच्या नेत्यांसह उमेदवारांच्या हेतूबद्दल शंका घेणारे पी. डी. पाटील, धनाजीराव सरनोबत व सुरेश देसाई यांच्याकडे एवढी मालमत्ता आली कोठून? असा सवाल करीत, या मंडळींच्या ताब्यात
संघ असताना त्यांनी काय दिवे लावलेत, हे सभासद जाणून असल्याची टीका ‘मोहिते-नेसरीकर सत्तारूढ पॅनेल’चे प्रमुख शोभादेवी शिंदे-नेसरीकर व मानसिंगराव
जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.
शोभादेवी शिंदे आणि मानसिंगराव जाधव म्हणाले, गेल्या पाच वर्षांत आम्ही अत्यंत काटकसरीचा कारभार करून संघाला ऊर्जितावस्थेत आणण्याचा प्रयत्न केला. संघावरील कर्जाचा बोजा कमी करीत सभासदांना पाच वर्षांत सात टक्क्यांपासून १२ टक्क्यांपर्यंत लाभांश दिला. एकेकाळी आशिया खंडात नावाजलेल्या संघाचे वैभव परत आणण्यासाठी गेली पाच वर्षे सर्वांनी मनापासून काम केले. रुकडी येथील खताचा कारखाना सुरू केला, कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले. शाखा सक्षम करून व्यवसाय वाढविला. डिझेल विभाग, चटणी-मसाले, खते हे विभाग नफ्यात आणले. संघाचे हित डोळ्यांसमोर ठेवूनच आम्ही वाटचाल केली.
सत्ताधारी पॅनेलमध्ये अनुभवी चेहरे नसल्याची टीका विरोधक करीत आहेत; पण गेली ५५ वर्षे आपण सहकारात काम करीत आहोत. साखर उद्योगात संपूर्ण महाराष्ट्रात माझी ओळख आहे. त्याचबरोबर राजू पाटील, दिलीप पाटील, व्यंकाप्पा भोसले, आदी मंडळींनी सहकारात आपला ठसा उमटविला आहे. विरोधकांपेक्षा कितीतरी पटींनी अनुभवी व स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार आमच्याकडे असल्याचे मानसिंगराव जाधव यांनी सांगितले.
जे आमच्यावर टीका करीत आहेत, त्यांच्या काळात संघाची अवस्था काय झाली, याचे आत्मचिंतन करावे; मग आमच्यावर बोलावे. या मंडळींच्या कारभारामुळे आपण बदनाम होऊ म्हणून मी आणि स्वर्गीय शामराव शिंदे यांनी राजीनामा दिला होता. आम्हाला कधीच सत्तेची हाव नाही; पण आमच्या हेतूवर शंका घेणारे पी. डी. पाटील, सुरेश देसाई व धनाजीराव सरनोबत यांच्याकडे एवढी मालमत्ता आली कशी? याचे आत्मचिंंतन करावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
सत्तेच्या लालसेपोटी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो नाही. ‘मोहिते-नेसरीकर’ यांच्या विचारांवर प्रेम करणारी मंडळी आहोत. त्यांच्या विचारांना तडा जाईल, त्या दिवशी संघातून बाहेर पडू, असे जाधव व शोभादेवी शिंदे यांनी सांगितले.