‘पी ढबाक’चा गजर दोन मंगळवार, तीन शुक्रवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:17 AM2021-07-11T04:17:26+5:302021-07-11T04:17:26+5:30
कोल्हापूर : आषाढ महिना आज, रविवारपासून सुरू झाला असून, त्र्यंबोली यात्रेचा ‘पी ढबाक’या वाद्याचा गजर यंदा दोन मंगळवार व ...
कोल्हापूर : आषाढ महिना आज, रविवारपासून सुरू झाला असून, त्र्यंबोली यात्रेचा ‘पी ढबाक’या वाद्याचा गजर यंदा दोन मंगळवार व तीन शुक्रवारी होणार आहे. कोरोनामुळे सध्या मंदिर बंद असले तरी धार्मिक विधी सुरू राहतील. तरी नागरिकांनी परिसरात गर्दी करू नये व तयार नैवेद्याऐवजी कोरडा शिधा द्यावा, असे आवाहन पुजारी प्रदीप गुरव यांनी केले आहे.
आषाढ महिन्यात घरोघरीच्या यात्रा तसेच मंगळवार व शुक्रवारी त्र्यंबोली यात्रा होते. नदीला आलेले नवे पाणी देवीला वाहण्यासाठी भागाभागांतील स्थानिक तरुण मंडळांच्या वतीने ‘पी ढबाक’च्या गजरात या पाण्याची मिरवणूक काढली जाते. मात्र गेल्या वर्षीपासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर सगळ्या जत्रा, यात्रांवर बंदी आली. गेल्या वर्षीही या काळात कोरोनाचा संसर्ग होता. यंदादेखील कोल्हापुरात अजून दुसरी लाट ओसरलेली नाही. त्यामुळे मंदिरे बंद आहेत. या पार्श्वभूमीवर आज, रविवारपासून आषाढ महिन्याला सुरुवात होत आहे. मात्र कोरोना निर्बंधांमुळे दरवर्षीप्रमाणे नागरिकांना वाजतगाजत मिरवणुका काढता येणार नाहीत.
--
यात्रेचे दिवस असे
मंगळवार (दि. १३), शुक्रवार (दि. १६), (दि. ३० जुलै). मंगळवार (३ ऑगस्ट), शुक्रवार (६ ऑगस्ट).
---
एकादशी, अंगारकी संकष्टी मंगळवारी
या महिन्यात एका मंगळवारी (दि. २०) आषाढी एकादशी आहे, त्यापुढच्या मंगळवारी (दि. २७) अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे; तर शुक्रवारी (दि. २३) गुरुपौर्णिमा आहे. या तीनही दिवशी त्र्यंबोली यात्रा करता येणार नाही. त्यामुळे जुलैचा शेवटचा शुक्रवार आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात त्र्यंबोली यात्रांचा धडाका असणार आहे.
---
गर्दी नको, कोरडा शिधा द्या
कोरोनाचे निर्बंध असल्याने नागरिकांनी त्र्यंबोली मंदिराच्या परिसरात गर्दी करू नये, शिजविलेल्या अन्नाच्या स्वरूपात नैवेद्य न देता गतवर्षीप्रमाणे कोरडा शिधा द्यावा. मंदिर बंद असले तरी शासकीय नियमांच्या अधीन राहून यात्रेचे सर्व धार्मिक विधी पार पाडले जातील. तरी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुजाऱ्यांनी केले आहे.
---