त्र्यंबोली यात्रेसाठी पी ढबाकचा गजर यंदा चार दिवस
By admin | Published: July 3, 2017 04:13 PM2017-07-03T16:13:49+5:302017-07-03T16:13:49+5:30
आषाढी यात्रेसाठी चारच दिवस मिळणार
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. 0३ : त्र्यंबोली देवीच्या आषाढी यात्रेसाठी यंदा दोन मंगळवार आणि दोन शुक्रवार असे चारच दिवस मिळणार आहे. शुक्रवापासून (दि. ७) कोल्हापुरात पी ढबाकचा गजर सुरु होणार असून शहरातील पेठापेठांमध्ये, आणि तालीम मंडळांमध्ये याची जय्यत तयारी सुरु झाली आहे.
पंचगंगेला आलेले नवीन पाणी आषाढातील मंगळवार आणि शुक्रवारी त्र्यंबोली देवीला वाहण्याची परंपरा आहे. यासाठी शहरातील प्रत्येके पेठांमधून नदीचे पाणी भरलेले कलश घेवून नागरिक त्र्यंबोली टेकडीवर जातात. या यात्रेसाठी घरटी वर्गणी गोळा केली जाते. आषाढ महिना सुरु होवून आठ दिवस झाले असले तरी पंढरपूरला गेलेले वारकर परत आल्याशिवाय आणि आषाढी एकादशी झाल्याशिवाय या यात्रेला प्रारंभ होत नाही.
मंगळवारीच एकादशी असल्याने त्र्यंबोली यात्रेचा हा दिवस गेला. त्यामुळे शुक्रवारपासून (दि.७) यात्रेला खऱ्या अर्थाने सुरवात होईल. पुढील आठवड्यातील मंगळवार (दि. ११) आणि शुक्रवार (दि.१४) या दोन दिवशी भाविकांची मोठी गर्दी असणार आहे. त्यानंतरच्या शुक्रवारी (दि.२१) प्रदोष असल्याने या दिवशीही त्र्यंबोली यात्रा साजरी करता येणार नाही.
रविवारी (दि.२३) अमावस्या आहे. त्यामुळे यंदा या यात्रेसाठी दोन मंगळवार आणि दोन शुक्रवार असे चारच दिवस मिळणार आहेत. यामुळे आता शहरातील सर्व गल्ली बोळांमध्ये आणि पेठापेठांमधील फलकांवर त्र्यंबोली यात्रेची तारीख आणि वर्गणीची रक्कम नोंद करण्यात आली आहे. महागाई वाढल्याने वर्गणीचा दरही अडीचशे करण्यात आला आहे.