‘गोकुळ’साठी ‘पी. एन.’ यांच्याकडून तीन जागांचाच प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:23 AM2021-03-18T04:23:43+5:302021-03-18T04:23:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघामध्ये आघाडीबाबत आमचे ज्येष्ठ मित्र आमदार पी. एन. पाटील व आपली बैठक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघामध्ये आघाडीबाबत आमचे ज्येष्ठ मित्र आमदार पी. एन. पाटील व आपली बैठक झाली, यामध्ये त्यांनी आम्हाला तीन जागांचाच प्रस्ताव दिल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकातून दिली. बैठकीमध्ये अनेक खासगी स्वरूपांच्या गोष्टींवर चर्चा झाली, मात्र त्या जाहीर करणार नाही, ती आचारसंहिता मी निश्चितपणे पाळेन. कारण, एका चांगल्या भावनेने व प्रामाणिकपणाने आम्ही दोघांनी चर्चा केल्या होत्या. आमच्या मैत्रीमध्ये अडचण येण्याचे काहीच कारण नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
माझ्यासह आमदार पी. एन. पाटील व पालकमंत्री सतेज पाटील आम्ही तिघेही सत्तारुढ महाविकास आघाडीचे घटक आहोत. गोकुळ दूध संघासह इतर सर्व संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकत्र येऊन त्या लढवाव्यात, हा माझा प्रामाणिक हेतू आहे. त्यामध्ये संघर्ष झाला तर जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसेल, या प्रामाणिक भावनेतून एकत्र येण्याच्या माझ्या विनंतीस मान देऊन आमदार पी. एन. पाटील यांनी प्रतिसाद दिला व चार बैठका झाल्या. सत्तेत ते असल्यामुळे ते किती जागा देतात, हीच मागणी मी सातत्याने केली.
दरम्यान, रविवारी जिल्हा बँकेमध्ये झालेल्या चर्चेमध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे चारच उमेदवार असून ते आम्ही बदलणार नाही, असे आमदार पाटील यांनी सांगितले. कागलमध्ये तुम्हाला घेऊ व माजी आमदार के. पी. पाटील यांना एक जागा देऊ. पालकमंत्र्यांचा विषय काढल्यानंतर त्यांनी एखादी जागा त्यांना देऊ, असे सांगितले. यावर मी जे काही भाष्य केले ते मी सार्वजनिक करणार नाही. मी चर्चा करून तुम्हाला कळवितो, असे सांगितले.
तसेच माझ्या बैठकीच्या बाहेरच्या दालनामध्ये आमदार पाटील यांचे सहकारी शिवाजी कवठेकर व सदानंद पाटील (गडहिंग्लज) हे दोघे मी व पी. एन. पाटील यांनी एकत्र यावे, यासाठी प्रयत्नशील होते. त्यांच्यापुढे पी. एन. पाटील यांचा प्रस्ताव मी जसाच्या तसाच सांगितला. तेथून शांतिनिकेतन स्कूलमध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेऊन सदर भेटीची माहिती दिली. यावेळी पालकमंत्री पाटील संतप्त झाले व त्यांनी आपण यामध्ये येणार नाही. तुम्ही कोणाबरोबर जायचे तो निर्णय घ्या, असे सांगितले.
पालकमंत्री व माझी गट्टी पक्की
‘गोकुळ’च्या मागील निवडणुकीत राष्ट्रवादीची मते मिळाली नाहीत, असे सत्तारूढ गटाचे म्हणणे आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये मल्टिस्टेटसह अनेक विषयांवर पालकमंत्री पाटील व आम्ही एकत्र काम केले. त्यामुळे त्यांना घेऊनच मला निर्णय घ्यावा लागेल, असेही आपण पी. एन. पाटील यांचेसमोर अनेकवेळा स्पष्ट केले.