पी. के. जोशींकडून १९ लाखांची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 04:56 PM2017-08-12T16:56:48+5:302017-08-12T16:58:25+5:30
कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या लक्ष्मीपुरी शाखेतील लेखापाल पी. के. जोशी यांनी अपहार केलेल्या ३० लाख ५० हजार रुपयांपैकी १९ लाख रुपयांची वसुली बॅँकेने त्यांच्याकडून केली आहे. उर्वरित रक्कम भरण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली असून, त्यानंतर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली बॅँकेने सुरू केल्या आहेत.
कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या लक्ष्मीपुरी शाखेतील लेखापाल पी. के. जोशी यांनी अपहार केलेल्या ३० लाख ५० हजार रुपयांपैकी १९ लाख रुपयांची वसुली बॅँकेने त्यांच्याकडून केली आहे. उर्वरित रक्कम भरण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली असून, त्यानंतर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली बॅँकेने सुरू केल्या आहेत.
लक्ष्मीपुरी शाखेत जोशी यांनी अपहार केल्याचे जुलैच्या दुसºया आठवड्यात बॅँक प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर हे प्रकरण शाखेच्या पातळीवरच दडपण्याचा प्रयत्न झाला; पण याबाबतचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली. जोशी यांनी बचत गटांसह शाखेतील काही कर्मचाºयांच्या खात्यांवर डल्ला मारल्याचे उघड झाले होते.
बॅँक प्रशासनाने चौकशी सुरू केल्यानंतर जोशी रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे नेमका किती रकमेचा अपहार केला याचा उलगडा होण्यास विलंब झाला. बॅँकेच्या पथकाने सखोल चौकशी केल्यानंतर ३० लाख ५० हजार रुपयांचा अपहार झाल्याचे पुढे आले. त्यानंतर वसुलीची कारवाई बॅँकेने सुरू केली.
पहिल्या टप्प्यात जोशी यांनी सव्वानऊ लाख भरले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने आतापर्यंत १९ लाख रुपये भरले आहेत. उर्वरित रक्कम वसुलीचे प्रयत्न सुरू आहेत. अपहारातील उर्वरित रक्कम दोन दिवसांत भरण्याचे आश्वासन जोशी यांनी दिले आहे. त्यानंतर त्यांच्यासह संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे.
जोशींची कारकीर्द चांगली, मग...
पी. के. जोशी यांची आतापर्यंतची कारकीर्द व कौटुंबिक परिस्थिती चांगली असल्याने त्यांच्या हातून अपहार कसा झाला? याबाबत बॅँक कर्मचाºयांत चर्चा आहे. त्यामुळे यामध्ये आणखी कोणाचा हात आहे, याची कसून चौकशी सुरू आहे.
दहाजणांच्या बदल्या
लक्ष्मीपुरी शाखेत काम करणाºया सगळ्याच दहाजणांची बदली केलेली आहे; पण अद्याप चौकशी व अपहाराची संपूर्ण रक्कम न आल्याने ते त्याच शाखेत कार्यरत आहेत.