पी. एन. यांच्याकडून खुपिरे रुग्णालयास ५० लाखांचा निधी; ऑक्सिजन निर्मिती करणार : गगनबावड्यास रुग्णवाहिका देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:22 AM2021-05-22T04:22:04+5:302021-05-22T04:22:04+5:30
कोल्हापूर : खुपिरे (ता. करवीर) येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासाठी ५० लाख रुपयांचा निधी दिला असून लवकरच हा ...
कोल्हापूर : खुपिरे (ता. करवीर) येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासाठी ५० लाख रुपयांचा निधी दिला असून लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होत आहे. गगनबावड्यासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका देणार असल्याचे आमदार पी. एन. पाटील यांनी शुक्रवारी सांगितले.
भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार पाटील म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजन ही महत्त्वाची गरज बनली आहे. त्यामुळे खुपिरे ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी ५० लाखांचा निधी दिला आहे. यापूर्वी हसूर दुमाला व खुपिरे येथे रुग्णवाहिका दिली असून गगनबावडा तालुक्यासाठी एक रुग्णवाहिका देणार आहे. राजीव गांधींच्या दूरदृष्टीतूनच आजच्या प्रगत भारताची उभारणी झाली आहे.
यावेळी गरजूंसाठी २५ हजार मास्क व २० हजार सॅनिटायझरच्या बॉटल्सचे वाटप करण्यात आले. गेल्यावर्षीही आमदार पाटील यांनी ७० हजार सॅनिटायझर बॉटलचे वाटप केले होते. प्रारंभी राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार पाटील व करवीर पंचायत समितीचे उपसभापती अविनाश पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रीपतरावदादा बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील, करवीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शंकरराव पाटील, ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे, माजी संचालक उदय पाटील, संजय गांधी अनुदान समितीचे अध्यक्ष संदीप पाटील, जिल्हा परिषद सद्स्य सुभाष सातपुते, माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, शिवाजी कवठेकर यांच्यासह भोगावती साखर कारखाना,श्रीपतरावदादा बँक राजीवजी सूतगिरणी, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
२१०५२०२१-कोल-पीएनपाटील न्यूज
कोल्हापुरात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आमदार पी. एन. पाटील यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी राजेश पाटील, राहुल पाटील, शंकरराव पाटील, बाळासाहेब खाडे आदी उपस्थित होते.