पी. एन.’ ‘भोगावती’च्या रिंगणातून स्वत:हून बाजूला

By विश्वास पाटील | Published: June 27, 2023 11:09 PM2023-06-27T23:09:58+5:302023-06-27T23:10:11+5:30

महाराष्ट्राच्या सहकारी साखर कारखानदारीच्या इतिहासात विद्यमान अध्यक्षांनीच रिंगणातून बाजूला होणे, ही दुर्मिळ घटना असावी.

P. N.’ aside from the arena of ‘Bhogavati’ | पी. एन.’ ‘भोगावती’च्या रिंगणातून स्वत:हून बाजूला

पी. एन.’ ‘भोगावती’च्या रिंगणातून स्वत:हून बाजूला

googlenewsNext

कोल्हापूर : परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्यासाठी कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष, काँग्रेसचे जेष्ठ आमदार पी. एन. पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील एकानेही अर्ज दाखल केलेला नाही. कारखान्याच्या स्थापनेपासून त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती सातत्याने कारखान्यात राहिली आहे. महाराष्ट्राच्या सहकारी साखर कारखानदारीच्या इतिहासात विद्यमान अध्यक्षांनीच रिंगणातून बाजूला होणे, ही दुर्मिळ घटना असावी.

‘भोगावती’ कारखान्याच्या स्थापनेपासून आमदार पी. एन. पाटील यांच्या घराण्यातील व्यक्ती कारखान्याच्या राजकारणात सक्रिय आहे. १९९४ पासून २०१२ च्या निवडणुकीचा अपवाद वगळता कारखान्याचे नेतृत्व आमदार पाटील यांच्याकडे आहे. मागील निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आमदार पाटील हे स्वत: रिंगणात उतरले आणि अध्यक्ष झाले. त्यांनी गेल्या पाच वर्षांत कारखान्याची विस्कटलेली घडी पूर्वपदावर आणण्याचा कसोशीने प्रयत्न केला. कारखान्यात आर्थिक शिस्त लावत शेतकऱ्यांच्या ऊस बिलासह ऊस तोडणी व ओढणीची बिलेही त्यांनी अदा केली आहेत. त्यामुळे यावेळेला त्यांच्या नेतृत्वाखालीच सत्तारुढ गट निवडणुकीला सामोरे जाईल, असे सभासदांना वाटत होते. कारखान्याच्या हितासाठी निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन त्यांनी संबंधित घटकांना केले आहे. विरोधकांकडूनही त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असताना, आमदार पाटील यांनी उमेदवारी अर्जच दाखल न करणे हे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने धक्कादायक मानले जात आहे.

शिष्टमंडळाकडून उमेदवारीसाठी आग्रह

मंगळवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे सोमवारी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमदार पाटील यांची भेट घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत आग्रह धरला. तुम्ही नाहीतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांचा तरी अर्ज भरा, अशी विनंती केली, मात्र त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला.

सडोलीतून उमेदवार कोण..?

सडोली खालसा गावातून आमदार पाटील यांच्या गटाच्या एकाही इच्छुकाने अर्ज दाखल केलेला नाही. ‘शेकाप’चे अशोकराव पवार, त्यांचे बंधू रामदास पवार व सुपुत्र अक्षय पवार यांनी अर्ज दाखल केेले आहेत. अलीकडे आमदार पाटील व पवार गटात समझोत्याचे राजकारण सुरू झाल्याने येथे अनपेक्षित घडामोडी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

भोगावती’मध्ये आतापर्यंत पाटील घराण्याचे प्रतिनिधी

दत्तात्रय रामजी पाटील (प्रवर्तक)
नारायण रामजी पाटील
संभाजीराव नारायण पाटील
दीपक राजाराम पाटील
आमदार पी. एन. पाटील

Web Title: P. N.’ aside from the arena of ‘Bhogavati’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.