पी. एन., के. पी., ए. वाय. आज एकत्र
By admin | Published: December 30, 2014 12:14 AM2014-12-30T00:14:44+5:302014-12-30T00:16:03+5:30
जिल्ह्याचे लक्ष : आर. सी. पाटील यांच्या सत्काराचे निमित्त; शाहू स्मारकमध्ये कार्यक्रम
शिरगाव : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक आर. सी. पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त उद्या, मंगळवारी दुपारी तीन वाजता दसरा चौकातील शाहू स्मारक भवनमध्ये होणाऱ्या सत्कार समारंभाच्या निमित्ताने जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील, राष्ट्रवादीचे कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष के. पी. पाटील व एस. टी. महामंडळाचे संचालक व राष्ट्रवादीचे राधानगरी तालुक्याचे नेते ए. वाय. पाटील हे एकाच व्यासपीठावर येत असल्याने जिल्ह्याचे लक्ष या सत्कार समारंभाकडे लागले आहे.
विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीचे नेते ए. वाय. पाटील यांनी एका कार्यक्रमात करवीरचे शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या कार्याची प्रशंसा केल्याने नाराज झालेल्या माजी आमदार पी. एन. पाटील यांनी भोगावती व बिद्री परिसरातील कॉँग्रेसच्या नेतेमंडळींना एकत्र केले. त्यांच्या मदतीने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार के. पी. पाटील यांना पराभूत केले. पी. एन. पाटील यांच्या ताकदीचा अंदाज न आल्याने व राधानगरी- भुदरगड मतदारसंघात बदलाचे वारे झाल्याने के. पी. यांचा ३९ हजार मतांनी पराभव झाला. इकडे करवीर मतदारसंघातही पी. एन. पाटील यांचा शिवसेनेच्या चंद्रदीप नरके यांनी दुसऱ्यांदा पराभव केला. दोन्ही मतदारसंघात दोन्हीही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांना शिवसेनेच्या उमेदवारांनी पराभूत केले.
राजकारणात कोण कोणाचा कायमचा राजकीय शत्रू वा मित्र नसतो. आता भोगावती व दूधगंगा पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. आर. सी. पाटील यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभात माजी आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील व एस. टी. महामंडळाचे संचालक ए. वाय. पाटील हे व्यासपीठावर विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच एकत्र येत आहेत. त्यामुळे या सत्काराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.