MLA P.N. Patil passed away: कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात ‘मनपा’ची हुकुमत, दबदबा

By भारत चव्हाण | Published: May 24, 2024 11:42 AM2024-05-24T11:42:09+5:302024-05-24T11:43:51+5:30

तिघांच्या पेहराव्यात, वागण्यात एक साम्य होते. तिघेही सफारी ड्रेस घालायचे, डोळ्याना रेबॅन गॉगल घालायचे. त्यांच्यातील घट्ट मैत्रीचे हे लक्षण होते

P. N. Patil, Mahadevrao Mahadik, Arun Narke friendship in Kolhapur District Politics | MLA P.N. Patil passed away: कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात ‘मनपा’ची हुकुमत, दबदबा

MLA P.N. Patil passed away: कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात ‘मनपा’ची हुकुमत, दबदबा

कोल्हापूर: पी. एन. पाटील १९८५ पासून राजकारणात सक्रिय झाले. सासरे स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे यांच्या सांगरुळ मतदार संघातून आमदारकीची निवडणूक लढविण्याची त्यांनी तयारी सुरु केली. महादेवराव महाडिक यांची ओळख होती. 

१९९० साली महाडिक यांनीही सक्रिय राजकारणात प्रवेश केला तो कोल्हापूर महापालिकेच्या माध्यमातून ! त्यांच्या सोबत गोकुळचे तत्कालिन अध्यक्ष अरूण नरकेही होते. महाडिक राजकारणात सक्रिय होत आहेत, म्हटल्यावर पी. एन. पाटील यांना बळ मिळाले. महाडिक महापालिकेचे राजकारण बघणार होते. अरूण नरके सहकारात काम करणार होते तर पी. एन. सांगरूळमधून आमदारकीची निवडणूक लढविणार होते. तिघांनी तीन वेगवेगळे मार्ग स्वीकारले होते. त्यामुळे तिघांची राजकारणात घट्ट मैत्री जमली. त्यांना जिल्ह्याच्या राजकारणात ‘मनपा’ (महाडिक-नरके-पाटील) या नावाने ओळखले जाऊ लागले. जिल्ह्यात तिघांचाही दबदबा सुरु झाला. पुढे जिल्हा बँकेतही तिघे एकत्र आले.

‘मनपा’ नावाची जादू जिल्ह्याच्या राजकारणावर बरीच चालली. या तिघांना एक एक नेते, प्रमुख कार्यकर्ते येऊन मिळायला लागले. एवढेच नाही तर स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनीही या ‘मनपा’शी जुळवून घेतले. त्यामुळे मनपा लॉबीचा दबदबा आणि उपद्रव मूल्याही वाढले. महाडिकांनी अपेक्षेप्रमाणे ताराराणी आघाडीच्या माध्यमातून महापालिका ताब्यात घेतली. पी.एन. यांनी जिल्हा बँकेत वर्चस्व निर्माण केले. जिल्हा परिषदेवर आपली हुकुमत राखली. अरुण नरके गोकुळचे सलग दहा वर्षे अध्यक्ष झाले. २००४ व २०१९ साली पी. एन. पाटील आमदार झाले.

तिघांच्या पेहराव्यात, वागण्यात एक साम्य होते. तिघेही सफारी ड्रेस घालायचे, डोळ्याना रेबॅन गॉगल घालायचे. त्यांच्यातील घट्ट मैत्रीचे हे लक्षण होते. बघता बघता तिघांनी जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड निर्माण केली. मनपा लॉबी ठरवेल तो महापौर, ते सांगतील तो जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, ते ठरवतील तो जिल्हा बँकेचा अध्यक्ष. बाकी कोणीही काहीही सांगितले तरी ते ऐकत नसत. महाडिक यांच्या शब्दाला आणि पी.एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाला खूपच महत्व आले होते.

एकदा पॉप्युलर स्टील वर्कचे राजू जाधव यांनी महापौर होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन त्यांनाच विनंती केली. तेंव्हा शरद पवार यांनी केडीसीसी बँकेत पी. एन. पाटील यांना फोन लावला. राजू जाधव यांना महापौर करा असे शरद पवार सांगत आहेत, असा निरोप महाडिक यांना द्या, असे पवारांनी बजावले. पी. एन. नी निरोप दिला, पण महाडिकांनी काही ऐकले नाही. राजूंना महापौर केले नाही.

Web Title: P. N. Patil, Mahadevrao Mahadik, Arun Narke friendship in Kolhapur District Politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.