‘पी. एन.’ यांच्याशी दोस्ती तुटायची नाही
By admin | Published: May 14, 2017 01:11 AM2017-05-14T01:11:30+5:302017-05-14T01:11:52+5:30
महादेवराव महाडिक यांची ग्वाही : आयुष्यभर महाडिक यांच्यासोबतच - पी. एन. पाटील; ‘गोकुळ’मध्ये सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : विरोधकांनी आमच्या दोघांमध्ये कितीही वितुष्ट आणायचा प्रयत्न केला तरी पी. एन. पाटील यांच्याशी दोस्ती तुटायची नाही, अशी ग्वाही माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी दिली. तर कोणी कितीही प्रयत्न करू देत, आयुष्यभर महादेवराव महाडिक यांच्यासोबतच राहणार असल्याचे पी. एन. पाटील यांनी सांगितले.
भोगावती साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पी. एन. पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार शनिवारी ‘गोकुळ’च्या वतीने महादेवराव महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. संचालक मंडळाने महाडिक व पाटील यांचा गुलाबाच्या फुलांच्या मोठ्या हाराने एकत्रित सत्कार केला. हाच धागा पकडत महादेवराव महाडिक म्हणाले, एका हारात दोघांना घालण्याची गरज नाही, आम्ही एकच आहोत. कोणी कितीही वाईट चिंतू देत; महाडिक आणि पी. एन. एकत्रच राहणार. ‘गोकुळ’चे नेतृत्व दोघे करीत असून ते कायम राहील. ‘भोगावती’मध्ये ‘न भूतो, न भविष्यति’ असे यश ‘पी. एन.’ यांनी मिळविले आहे. या निवडणुकीत आपण त्यांनाच पाठबळ दिले होते. कर्ण आणि इंद्रदेवाचे उदाहरण देत महाडिक पुढे म्हणाले, पी. एन. आणि आपण दोन शक्ती एकसंध आहेत, या विभागल्या तर जिल्ह्णाच्या राजकारणात अडचण निर्माण होईल. त्यामुळे पी. एन. आणि आपले नाते तुटायचे नाही. अडचणीच्या काळात एकमेकांना साथ दिली, येथून पुढेही साथ राहील.
सर्व पक्षांची मंडळी विरोधात होती; पण महादेवराव महाडिक यांनी मदत केल्याचे सांगत कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील म्हणाले, जिल्हा बॅँकेत जसे निर्णय घेतले त्याप्रमाणे निर्णय कारखान्यात घ्यावे लागतील. ‘गोकुळ’ आशियात ‘नंबर वन’ असून यामागे संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान आहे. संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी स्वागत केले. अरुण डोंगळे यांनी आभार मानले. यावेळी संचालक, कार्यकारी संचालक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आप्पांकडे ‘भोगावती’चा ताळेबंद
पंधरा किलोमीटरच्या अंतरावरील ऊस केवळ ‘भोगावती’कडे उपलब्ध असताना गेल्या गळीत हंगामात केवळ पावणेचार लाख टन गाळप झाल्याने कारखान्याचे नुकसान झाले. त्यातून बाहेर काढण्यासाठी ‘पी. एन.’ यांना कठोर निर्णय घ्यावे लागतील. कारखाना पूर्वपदावर आणण्यासाठी त्यांना लागेल ती मदत करू, अशी ग्वाही महाडिक यांनी दिली.
चर्चेला पूर्णविराम
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवरून महाडिक व पी. एन. पाटील यांच्यात दरी निर्माण झाली होती. अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या ‘गोकुळ’च्या वतीने आयोजित सत्काराला ‘पी. एन.’ समर्थकांनी दांडी मारल्याने दरी वाढल्याची चर्चा होती; पण शनिवारी सत्कार समारंभाला दोघे एकत्र येऊन दोस्ती तुटायची नसल्याची ग्वाही दिल्याने चर्चेला पूर्णविराम मिळाला.
महाडिक फसले आणि सत्ता गेली
जिल्हा बॅँकेसह सर्व सत्ता आमच्याकडे होत्या; पण महाडिक यांना काही मंडळींनी फसविले आणि जिल्हा परिषदेसह जिल्हा बॅँकेतील सत्ता गेली, ती परत आलीच नसल्याचा टोला पी. एन. पाटील यांनी हाणला.
आता आमदारकीला अडचण नाही
‘गोकुळ’ने प्रत्येकाला मदत केली असून, ‘पी. एन.’ आमदारकीत तेवढे मागे राहिले आहेत. ‘भोगावती’ निवडणुकीपासून मतदारसंघातील परिस्थिती सुधारली आहे. आगामी काळात व्यवस्थित नियोजन केले तर आमदारकीला कोणतीही अडचण नसल्याचे महाडिक यांनी सांगितले.
विदूषकांमुळे जिल्हा
बॅँक अडचणीत
‘पी. एन’. यांच्यामुळेच ‘राजाराम’ कारखान्याचा अध्यक्ष झाल्याचे सांगत जिल्हा बॅँकेत त्यांच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत रामराज्य होते; पण विदूषकांच्या हाती सत्ता गेली आणि बॅँक अडचणीत आली. त्या कर्माची फळे आता शेतकऱ्यांना भोगावी लागत असल्याची टीका महाडिक यांनी केली.
कागलकडे लक्ष दिले असते तर...
‘पी. एन’ यांनी जिल्हा बॅँकेच्या कारभाराला शिस्त लावली होती; पण कागलात गेले नाहीत, गेले असते तर दुरुस्त झाले असते, असा चिमटा महाडिक यांनी काढला.