‘के. पीं.’ना नडला अती आत्मविश्वास

By admin | Published: October 24, 2014 12:16 AM2014-10-24T00:16:05+5:302014-10-24T00:16:32+5:30

विरोधक एकत्र : के .पी. हटाव मोहीम यशस्वी

'Of P. 'Nuntala high self-esteem | ‘के. पीं.’ना नडला अती आत्मविश्वास

‘के. पीं.’ना नडला अती आत्मविश्वास

Next

संजय पारकर - राधानगरी -विरोधक कधी एकत्र येऊच शकत नाहीत. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे, अशा फाजील आत्मविश्वासामुळेच गाफील राहिलेल्या के. पी. पाटील यांचा पराभव झाला. ऐनवेळी कॉँग्रेसच्या काही नेत्यांना गळाला लावण्यात यशस्वी होऊनही तरुणाईचा उत्साह व के. पी. हटावसाठी काय पण, ही कॉँग्रेसची खेळी यशस्वी ठरल्याने प्रकाश आबिटकर यांना दुसऱ्या प्रयत्नातच आमदारकी मिळालीे.
१९९९ च्या पराभवानंतर २००४ च्या निवडणुकीत तत्कालीन आमदार बजरंग देसाई यांना हटविण्यासाठी काही कॉँग्रेस नेत्यांनी अपक्ष लढलेल्या के. पीं.ना साथ दिली होती. त्यामुळे त्यांचा विजय झाला. पाच वर्षांपूर्वी षट्कोनी लढतीमुळे पुन्हा त्यांचा एकतर्फी विजय झाला. या दोन्ही वेळा विखुरलेले विरोधक हेच प्रमुख कारण त्यांच्या विजयात महत्त्वाचे ठरले होते. एकूण मतदानांपैकी सुमारे ३५ ते ४० टक्के मतदान राष्ट्रवादीला मानणारे होते. विरोधातील मतांची विभागणी झाली असती तर चित्र वेगळे असते.
गतवेळी अपक्ष लढून सुमारे ३५ हजार मतांपर्यंत मजल मारणाऱ्या प्रकाश आबिटकर यांना लोकसभा निवडणुकीत अंदाज घेण्याची संधी मिळाली. राष्ट्रवादीच्या मतात कॉँग्रेसची मतेही होती; पण त्याचे श्रेय घेताना राष्ट्रवादीने कॉँग्रेसला बेदखल केले. तेथूनच पुन्हा ठिणगी पडली. शिवसेनेला लोकसभेवेळी मिळालेल्या मतांमध्ये फारशी घट होण्याचे काहीच कारण नसल्याने आबिटकर यांनी शिवसेनेची उमेदवारी घेतली. येथेच त्यांना निम्मे यश मिळाले होते.
दोन महिने निकराचे प्रयत्न करूनही आघाडी तुटल्याने बजरंग देसाई यांना उमेदवारी मिळाली; पण त्यात के. पीं.नाच फायदा होणार हे स्पष्ट होते. शिवाय करवीरमधील खेळीमुळे बजरंग देसाई यांनी माघार घेतली. देसाई व अरुण डोंगळे वगळता कॉँग्रेस नेत्यांनी के. पी. हटावसाठीच आबिटकर यांची पाठराखण केली.
पाच वर्षांत २६६ कोटींची कामे केल्याचा दावा के. पीं.कडून ठळकपणे झाला; पण मतदारसंघातील रस्ते व्यवस्थित नाहीत. भोगावती कारखान्याच्या नोकरभरतीचे पडसादही उमटले. ‘बिद्री’ची जादा दर देण्याची खेळी अयशस्वी झाली. शेकाप-जनता दल अशा मित्रपक्षांनी दिलेला पाठिंबा कामी आलेला नाही. सर्वांत जास्त वाताहत झाली ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेची. त्यांची अनामत जप्त झाली. गतवेळी राष्ट्रवादीला साथ दिलेल्या आजरा तालुक्याची राजकीय फेरमांडणी झाली. त्यामुळे मोजकी गावे वगळता सर्वत्र एकतर्फी मतदान झाल्याचे स्पष्ट झाले. आजही राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या गावांतूनही शिवसेनेला मताधिक्य मिळाले.
तरुण आबिटकर यांना नवमतदारांसह तरुणांचा मोठा पाठिंबा मिळाला. परिवर्तन करायचेच, अशा ईर्ष्येने पेटलेल्या तरुणांमध्ये आपला उमेदवार अशी प्रतिमा निर्माण करण्यात यश आल्याने प्रकाश आबिटकर यांना मोठे यश मिळाले. त्यांच्यावर विश्वास टाकलेल्या तरुणाईला अपेक्षित असलेला विकास करण्याचे मोठे शिवधनुष्य ते कसे पेलतात, यावर त्यांची पुढील वाटचाल अवलंबून असणार आहे.
 

Web Title: 'Of P. 'Nuntala high self-esteem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.