Mahashivratri: शिवशंकराचे दर्शन देणारी कोल्हापूरच्या पी. सरदारांची कॅलेंडर चित्रे लक्षवेधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 15:47 IST2025-02-26T15:44:54+5:302025-02-26T15:47:38+5:30
चिंतनातून महाशिवरात्रीची चित्रे

Mahashivratri: शिवशंकराचे दर्शन देणारी कोल्हापूरच्या पी. सरदारांची कॅलेंडर चित्रे लक्षवेधी
कोल्हापूर : महाशिवरात्रीनिमित्त चित्रनिर्मितीतून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी चित्रकार पी. सरदार यांची शिवशंकराची कॅलेंडर चित्रांची संपदा आजही लक्षवेधी आहे.
हातकणंगले येथे मुस्लिम धर्मात जन्मलेले पी. सरदार म्हणजेच सरदार महंमद पटेल यांना कलानगरीतील चित्रकार आणि कॅलेंडर चित्रांचे बादशाह म्हटले जाते. कोल्हापूरच्या अभिजात आणि वास्तववादी चित्रपरंपरेत त्यांनी भर घातली आहे.
जगातले सर्वच धर्म दया, क्षमा आणि शांतीचा संदेश देतात असा संदेश ते आपल्या चित्रातून व्यक्त करत आले आहेत. त्यांनी निर्माण केलेल्या अनेक जाती धर्माच्या, देव-देवतांच्या चित्रांच्या कॅलेंडर स्वरूपातील लाखो प्रति काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत घराघरात पोहोचल्या आहेत. सबका मालिक एक असा संदेश देणाऱ्या कॅलेंडर चित्रातून ते प्रसिद्ध झाले. त्यानंतर त्यांनी तयार केलेल्या हजारो कॅलेंडर चित्रांनी त्यांना लोकप्रियता मिळवून दिली.
चिंतनातून महाशिवरात्रीची चित्रे
महाशिवरात्रीच्या निमित्ताने कॅलेंडर स्वरूपात देशभरातील विविध मंदिरात, घरात शिवशंकराची त्यांनी काढलेली चित्रे आजही दिसून येतात. ही चित्रे काढताना सरदार यांनी ध्यान, उपवास आणि चिंतन केले आहे. पार्वतीचा विवाह सोहळा, शंकराची विविध रूपे, समुद्रमंथनाने शंकराचे झालेले निळे क्षार रूपदर्शन, कैलास पर्वतावरील वास्तव्य, तसेच गणपती आणि नंदी शंकराच्या पिंडीची अभिषेक घालून पूजा करतात हे चित्र तर खूपच लोकप्रिय आहे.
हे जनप्रिय चित्रकार आज हयात नाहीत; पण त्यांच्या कलाकृतीतील अध्यात्माचे अधिष्ठान आजही स्मरण करून देते. त्यांच्या पश्चात मुलगा दारा आणि हरून, मुलगी शबनम स्वतंत्र चित्रनिर्मिती करतात. वडिलांच्या स्मरणार्थ त्यांनी कोल्हापुरातच सुरू केलेल्या पी आर्ट गॅलरीत त्यांच्या देवदेवतांच्या विविध रूपातील चित्रसंपदा प्रत्यक्ष पाहावयास मिळतात. - प्रशांत जाधव, चित्रकार