पालिकेसाठी उद्या शिरोळ बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:54 AM2017-07-31T00:54:20+5:302017-07-31T00:54:20+5:30

paalaikaesaathai-udayaa-sairaola-banda | पालिकेसाठी उद्या शिरोळ बंद

पालिकेसाठी उद्या शिरोळ बंद

Next
ठळक मुद्देसर्वपक्षीय लढा उभारण्यासाठी नेतेमंडळीसह ग्रामस्थ एकवटले



शिरोळ : शिरोळला नगरपालिका स्थापनेसाठी जनआंदोलनाची गरज आहे. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही. १ आॅगस्टपासून आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा निर्णय रविवारी शिरोळ येथे सभेत घेण्यात आला. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून १ आॅगस्ट रोजी शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढून गावबंद ठेवण्याचा निर्णय यावेळी झाला.
शिरोळचे ग्रामपंचायतीऐवजी नगरपालिकेत रुपांतर व्हावे, या पार्श्वभूमीवर येथील शिवाजी चौकात रविवारी सायंकाळी सभा झाली. अध्यक्षस्थानी रावसाहेब देसाई होते. तीन वर्षापासून नगरपालिका होण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. पालिका स्थापन करण्यासाठी सर्व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण झाली असतानाही नगरपालिका का होत नाही. त्यामुळे आता सर्वपक्षीय लढा उभारण्यासाठी नेतेमंडळीसह ग्रामस्थ एकवटले आहेत. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून १ आॅगस्ट रोजी गावबंद ठेवून तहसिल कार्यालयावर मोर्चा काढणे त्यानंतर ८ आॅगस्टला चक्काजाम आंदोलन, १४ आॅगस्टपर्यंत नगरपालिकेबाबत शासनस्तरावर निर्णय न झाल्यास १५ आॅगस्ट स्वातंत्र्यदिनी लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय यावेळी झाला.
यावेळी आमदार उल्हास पाटील म्हणाले, ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रुपांतर होण्यासाठी जनरेट्याची गरज आहे. शासन पातळीवर माझा निश्चित प्रयत्न राहील. गावच्या हितासाठी आता निर्णायक लढा उभारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्राणांतिक उपोषणात सहभागी होणार आहे.
यावेळी उपसरपंच पृथ्वीराज यादव, पं.स.सदस्य सचिन शिंदे, भाजपाचे तालुकाध्यक्ष धैर्यशिल देसाई, दरगू गावडे, जि.प.सदस्य अशोकराव माने, अमरसिंह पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील, बी.जी.माने, गजानन पाटील, शिवाजी संकपाळ, रावसाहेब देसाई यांनी मनोगते व्यक्त केली. स्वागत व प्रास्ताविक आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी केले. सुत्रसंचालन नंदू सुतार यांनी केले. बजरंग काळे यांनी आभार मानले.
तीव्र लढा उभारणार
शिरोळ ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रुपांतर व्हावे, या मागणीच्या पार्श्वभूमीवर लढा उभा करण्यासाठी सुकाणू समिती व कृती समितीची स्थापना यावेळी करण्यात आली. या दोन्ही समितीच्या माध्यमातून तीव्र लढा उभारण्याचा निर्णय यावेळी झाला.
शिरोळकरांची वज्रमूठ
शिरोळ येथे रविवारी झालेल्या सभेत सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी नगरपालिका व्हावी, यासाठी पाठिंबा व्यक्त केला. नगरपालिका काळाची गरज असून शिरोळ जनतेच्या रेट्यासमोर शासनाला झुकावे लागेल.
शिरोळ आणि आंदोलन हे समीकरण आहे. त्यामुळे आंदोलनाच्या भूमिकेतून शिरोळकरांनी वज्रमूठ बांधली आहे.

Web Title: paalaikaesaathai-udayaa-sairaola-banda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.