वीज दरासह पॅकेज इन्सेंटिव्ह, सवलती मिळवून द्या

By admin | Published: October 1, 2015 12:11 AM2015-10-01T00:11:01+5:302015-10-01T00:39:03+5:30

प्रकाश आवाडे : सुरेश हाळवणकर यांना आव्हान; इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचीसभा

Package incentives with a power tariff, get discounts | वीज दरासह पॅकेज इन्सेंटिव्ह, सवलती मिळवून द्या

वीज दरासह पॅकेज इन्सेंटिव्ह, सवलती मिळवून द्या

Next

इचलकरंजी : यंत्रमाग उद्योगाच्या ऊर्जितावस्थेसाठी तत्कालीन सरकारबरोबर संघर्ष करून पॅकेज इन्सेंटिव्ह, टफ्स, सवलतीचा वीज दर अशा सवलती आपण मिळविल्या आहेत. मात्र, सध्याचे भाजप सरकार या सवलती बंद करू पाहत आहे. ज्यामुळे यंत्रमाग उद्योग उद्ध्वस्त होईल. तरी आमदार सुरेश हाळवणकर यांनी हिवाळी अधिवेशनातील नवीन वस्त्रोद्योग धोरणात या सवलती मिळवून द्याव्यात, असे आवाहन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले.
इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स को-आॅप. असोसिएशनच्या वार्षिक सभेत आवाडे बोलत होते. ते म्हणाले, केंद्रात व राज्यात भाजप
सरकार सत्तेवर आल्याने आमदार हाळवणकर यांच्याकडून यंत्रमागधारक, कामगार, व्यापारी-व्यावसायिकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, यंत्रमाग उद्योगासाठी असलेल्या सवलती सरकार बंद करू लागल्याने यंत्रमागधारक व कामगारांच्या पदरी उपेक्षाच आली आहे. कॉँग्रेसचे शासन सत्तेवर असताना यंत्रमाग उद्योगावर सरकारची
कृपादृष्टी राहावी, यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले. वाढीव वीज दराची झळ यंत्रमागधारकांना पोहोचू दिली नाही. तर पॅकेज इन्सेंटिव्ह अनुदान ३५ टक्के व टफ्सचे अनुदान २० टक्क्यांवरून ३० टक्के करून घेतले.
आता मात्र ऊर्जामंत्र्यांनी ग्वाही देऊनही गेल्या महिन्यापासून विजेची बिले वाढून आली आहेत. तर वीज बिलांची पोकळ थकबाकी आणि त्यावरील व्याज प्रत्येक महिन्याला वाढतच चालले आहे, असे स्पष्ट करून आवाडे म्हणाले, राज्यात शेतीनंतर रोजगार देणारा यंत्रमाग उद्योग असल्याने आणि आमदार हाळवणकरांचा मतदारसंघ यंत्रमाग उद्योगाचाच असल्याने हा उद्योग टिकविण्यासाठी त्यांनी वस्त्रोद्योग धोरणात या सर्व सवलती मिळवून द्याव्यात, ज्यामुळे उद्योजकांबरोबर कामगारही सन्मानाने जगावा, यासाठी कामगार कल्याण मंडळाची स्थापना करावी.
याच सभेत बोलताना पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी वस्त्रोद्योगासमोरील समस्यांचा ऊहापोह केला आणि या समस्यांच्या सोडवणुकीसाठी पुन्हा रस्त्यावरील लढ्यासाठी तयार राहण्याचे आवाहन यंत्रमागधारकांना केले. असोसिएशनचे सचिव राम घायदार यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले.
सभेमध्ये इचलकरंजी जनता बॅँकेचे अध्यक्ष अशोकराव सौंदत्तीकर यांना डी.लिट. पदवी मिळाल्याबद्दल व आवाडे यांची साखर महासंघाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. संचालक चंद्रकांत पाटील यांनी सूत्रसंचालन केले व नारायण दुरुगडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. (प्रतिनिधी)


संपाचा फटका फक्त इचलकरंजीलाच का?
यंत्रमाग कामगारांचे किमान वेतन संपूर्ण राज्यासाठी असताना सायझिंग-वार्पिंग कामगारांनी केलेल्या ५२ दिवसांच्या संपाचा फटका फक्त इचलकरंजीलाच का? असा प्रश्न उपस्थित करून माजी मंत्री आवाडे यांनी किमान वेतन हे उद्योगाला परवडणारे आणि पीस रेटवर आधारित असले पाहिजे, असे सांगितले.

Web Title: Package incentives with a power tariff, get discounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.