पाडव्याची खरेदी कोट्यवधीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2016 12:39 AM2016-11-02T00:39:10+5:302016-11-02T00:39:10+5:30

बाजारपेठेत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची धूम : सोने, चांदीसह दुुचाकी आणि चारचाकी वाहनांचीही खरेदी

Padava purchase billions | पाडव्याची खरेदी कोट्यवधीत

पाडव्याची खरेदी कोट्यवधीत

Next

कोल्हापूर : वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवाळी पाडव्याला बाजारपेठेत स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची धूम होती. याशिवाय ‘पारंपरिक खरेदी’ म्हणून सोने-चांदी, दारात दुचाकी, चारचाकीचे आगमन अशा शुभशकुनांनी दिवाळी पाडवा साजरा करण्यात आला. आकर्षक योजना, नावीन्यपूर्ण उत्पादने आणि कर्ज सुविधांचा फायदा घेत ग्राहकांनी खरेदीचा यथेच्छ आनंद लुटला़
वर्षातील साडेतीन मुहूर्ताला खरेदी केली की घरात सुख-समृद्धी नांदते, अशी एक श्रद्धा आहे. त्यामुळे प्रत्येक मुहूर्ताला कमी-अधिक प्रमाणात विविध वस्तूंची खरेदी केली जाते. मात्र, दिवाळी हा वर्षातला सर्वांत मोठा सण असतो. भिशी, बोनस, वाढीव पगार, यांमुळे नागरिकांची क्रयशक्तीही वाढलेली असते. त्यामुळे इतरवेळी शक्य असो वा नसो दिवाळी पाडव्याला प्रत्येकाच्या घरी एका नवीन वस्तूचे आगमन होतेच. सणाची खरेदी म्हणजे सोने-चांदी ही पारंपरिक मागणी आता मागे पडली आहे. त्याऐवजी महिलांचे काम हलके करणाऱ्या आणि आनंद देणाऱ्या वॉशिंग मशीन, फ्रीज, ओव्हन, फुड प्रोसेसर, एलईडी, मोबाईल होमथिएटर, सीडी प्लेयरसारख्या वस्तूंना प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत या उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर मागणी होती़ इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या खरेदीसाठी टेंबे रोड, शाहू स्टेडियम, शिवाजी स्टेडियम, राजारामपुरी, शाहूपुरी, महाद्वार येथील शोरूम्स गर्दीने फुलली होती. याशिवाय होम अ‍ॅप्लायन्सेस, दुचाकी, चारचाकी वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात आली.
तसेच अनेकांच्या दारात नव्या कोऱ्या दुचाकी-चारचाकीचे आगमन झाले. ग्राहकांनी हजारोंच्या संख्येने दुचाकी-चारचाकी गाड्या खरेदी केल्या. या खरेदीवरही कंपन्यांच्यावतीने कमीत कमी डाऊन पेमेंट, कमीत कमी व्याजदर, एक्स्चेंज आॅफर आणि खरेदीवर हमखास बक्षीस अशा आकर्षक योजना जाहीर करण्यात आल्या होत्या. त्याचा लाभ कंपन्यांना आणि ग्राहकांनाही झाला.
सोने-चांदी ‘एव्हरग्रीन’
मुहूर्ताच्या दिवशी अन्य वस्तूंचे कितीही मागणी वाढली तरी सोने-चांदीच्या बाजारपेठा नेहमीच गजबजलेल्या असतात. दिवाळीनंतर लग्नाचे मुहूर्त सुरू होतात त्यामुळे पाडव्याच्या मुहूर्तावर महिलांनी विवाहाच्या खास अलंकारांच्या खरेदीवर भर दिला. त्यात अंगठी, चेन, लहान मोठे मंगळसूत्र, गंठण, बांगड्या, कानातले टॉप्स अशा दागिन्यांची खरेदी करण्यात आली, तर तरुणाईला हिऱ्यांच्या अंगठ्यांनी आकर्षित केले. मुहूर्ताला वळे, सोन्याचे नाणी अशा चोख सोन्याची खरेदी केली जाते. मात्र, आता मंदीचे सावट थोडे दूर होत आहे त्यामुळे ग्राहकांनी चोख सोन्याऐवजी तयार दागिन्यांच्या खरेदीला पसंती दिल्याची माहिती महेंद्र ज्वेलर्सचे भरत ओसवाल यांनी दिली. चांदीमध्ये पूजेचे साहित्य, पैंजणाची खरेदी करण्यात आली.
एकदम पैसा घालून एखादी वस्तू खरेदी करणे मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडत नाही, ही बाब लक्षात घेऊन इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांकडून शून्य टक्के व्याजदर आणि झिरो डाऊन पेमेंटवर खरेदीची आॅफर देण्यात आली आहे. तीन कागदपत्रे जमा केले की एक रुपयाही न भरता वस्तू घरात येते, हे लक्षात आल्याने ग्राहकांनी या योजनेचा पुरेपूर वापर केला. त्यामुळे अशा स्कीम्सवर एलईडी, फ्रीज, वॉशिंग मशीन, डिव्हीडी प्लेअर विथ होमथिएटर, फूड प्रोसेसर, ओव्हन अशा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आल्याची माहिती राजाकाका ई-मॉलचे दीपक केसवानी यांनी दिली.
मोबाईल टेक्नॉलॉजीवर भर
दहा वर्षांपूर्वी साधा मोबाईल खरेदी करणेही कुणाच्या आवाक्यात नव्हते. मात्र, आता स्मार्ट फोनच्याही पुढे जाऊन फोर जीसारख्या टेक्नॉलॉजी असलेल्या मोबाईलची मागणी होत आहे. पाडव्यादिवशी बाजारपेठेत ओपो, सॅमसंग, जिओनी, विवो या कंपन्यांच्या मोबाईलना ग्राहकांनी पसंती दिल्याची माहिती स्टारलाईट मोबाईलचे यासीर बागवान यांनी दिली. महागडे मोबाईल घेतले की त्यांची काळजीही तेवढीच घ्यावी लागते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी मोबाईल कव्हरसारख्या अ‍ॅक्सेसरिजनाही वाढती मागणी होती. भाऊबीजेनिमित्त बहिणीला स्मार्टफोन गिफ्ट करण्याकडे भावांचा कल होता.
 

Web Title: Padava purchase billions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.