शित्तूर-वारूण परिसरात भातरोप लावणी खोळंबल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:30 AM2021-07-07T04:30:29+5:302021-07-07T04:30:29+5:30
सतीश नांगरे लोकमत न्यूज नेटवर्क शित्तूर-वारूण : पर्जन्यवृष्टीचे क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील शित्तूर-वारूण परिसरात गेल्या ...
सतीश नांगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
शित्तूर-वारूण : पर्जन्यवृष्टीचे क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील शित्तूर-वारूण परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने भातरोप लावणीची कामे खोळंबली आहेत. यामुळे हवालदिल झालेला बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.
शित्तूर-वारूण परिसरामध्ये भातशेती ही मोठ्या प्रमाणात केली जाते. उंच-सखल, डोंगर-पठारावर असणाऱ्या शेतामध्ये भातरोप लावण पद्धतीने केली जाते. परिसरातील उखळू, शित्तूर-वारूण, विरळे, जांबूर, कांडवण या परिसरात रोप पद्धतीने भाताची लावण केली जाते. त्यासाठी मृग नक्षत्राच्या सुरुवातीसच आपल्याला हव्या असणाऱ्या भात बियाणांचा ‘तरवा’ टाकला जातो. त्या तरव्याची वाढ ही रोप लावणी योग्य होताच जोरदार पावसात बैलांच्या औताच्या साहाय्याने किंवा रोटावेटरच्या मदतीने चिखलगट्टा करून रोप लावले जातात. यावर्षी तरव्यांची उगवण ही समाधानकारक होऊन देखील गेल्या पंधरा दिवसांपासून या परिसरात वैशाखासारखे कडक ऊन पडत असल्यामुळे रोपा लावायच्या कशा? असा प्रश्न शेतकरी वर्गास पडला आहे.
ज्या ठिकाणी नदी, ओढे-ओहळांचे पाणी उपलब्ध आहे, अशा ठिकाणी मोटर किंवा इंजिनच्या साहाय्याने रोप लावण केली जात आहे. मात्र, ज्या ठिकाणी पाण्याची कोणतीच सोय नाही, अशा ठिकाणी पावसाच्या प्रतीक्षेशिवाय बळीराजाकडे दुसरा पर्याय उरलेला नाही. कडक उन्हामुळे भाताचा तरवाही आता वाळू लागला आहे. काही ठिकाणी तरव्याला उट्या लागला असून यंदाचा खरीप हंगाम यामुळे धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.
०६शित्तूर वारूण
फोटो : शित्तूर-वारूण (ता. शाहूवाडी) परिसरात इंजिन किंवा मोटारीच्या सहाय्याने ओढ्या-ओहळांचे पाणीउपसा करून रोप लावण्यासाठी चिखलगट्टा करताना शेतकरी.