आजरा तालुक्यात भात पेरणी, टोकणीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:20 AM2021-05-30T04:20:30+5:302021-05-30T04:20:30+5:30
सध्या सुरू असलेले लॉकडाऊन, डिझेलचे वाढलेले दर व पेरणीसाठी जनावरे मिळत नसल्याने सध्या ही कामे घरातील तरुण वर्गाला करावी ...
सध्या सुरू असलेले लॉकडाऊन, डिझेलचे वाढलेले दर व पेरणीसाठी जनावरे मिळत नसल्याने सध्या ही कामे घरातील तरुण वर्गाला करावी लागत आहेत. गेल्या आठ दिवसांत आजरा तालुक्यात वादळीवाऱ्यासह पडलेल्या पावसाने शेती मशागतीची कामे व पेरणीच्या कामाला वेग आला आहे. तालुक्यात जवळपास ४० ते ५० टक्के क्षेत्रावर धूळवाफ पेरणी व टोकणनी केली जाते.
कमी वेळेत व कमी खर्चात यांत्रिकीकरणाच्या साह्याने गेल्या दहा ते बारा वर्षांत शेती केली जात आहे. मात्र, चालू वर्षी डिझेलचे वाढलेले दर यामुळे ट्रॅक्टरच्या साह्याने मशागत करणे परवडत नाही. बैलांचे औत मिळत नाही व ट्रॅक्टरचे दर परवडत नाहीत. असे असले तरी शेतकऱ्याला यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय राहिलेला नाही. ट्रॅक्टरच्या साह्याने शेतीची नांगरणी, बाडगे मारणे, रोटर फिरवणे व पेरणी करणे ही कामे सध्या सुरू आहेत.
धूळवाफ पेरणीसाठी शक्यतो बैलांचा वापर करून कुरीने भाताची व सोयाबीनची पेरणी केली जाते. मात्र, जनावरे उपलब्ध होत नसल्याने सध्या घरातील तरुणांना कुरीला जुंपून भाताची पेरणी केली जात आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांकडून हलक्या कुरीचा वापर केला जातो. शेतीच्या मशागतीच्या कामाबरोबर कुरी ओढण्याचे काम उत्साहाने तरुणांकडून होत आहे. आजरा तालुक्याच्या पूर्व भागातील बहुतांशी गावात भात, सोयाबीन पेरणी व टोकणीच्या कामाने वेग घेतला आहे.
फोटोकॅप्शन - मासेवाडी - जाधेवाडी (ता.आजरा )येथे शेतकरी बैलांऐवजी तरुणांनाच कुरीला जुंपून भाताची पेरणी करताना.
२९ आजरा भात पेरणी