पाडगावकरांचे कोल्हापूरशी जिव्हाळ्याचे नाते
By admin | Published: December 31, 2015 12:39 AM2015-12-31T00:39:52+5:302015-12-31T00:42:08+5:30
मंगेश पाडगावकर हे अत्यंत संवेदनशील व खऱ्या अर्थाने माणूसपण जपणारे साहित्यिक क्षेत्रातील एक तारा होते.
कवी मंगेश पाडगावकर यांनी मराठीत विविध स्वरूपी कविता लिहिल्या. सन १९६० नंतरच्या आधुनिक कवितेत रोमँटिक जाणीवेच्या प्रवाहातील ती एक महत्त्वाची कविता मानली गेली. काळाच्या टप्प्यांवर ती बदलतही राहिली. प्रेम, निसर्ग, सामाजिक व राजकीय जाणीवेची कविता त्यांनी लिहिली. बालकविता, वात्रटिका, भावगीते लिहिली. त्यांच्या सांस्कृतिक कामगिरीचे एक महत्त्वाचे वेगळेपण म्हणजे महाराष्ट्रभर त्यांनी कविता लोकप्रिय केली. त्यांच्या कवितासंग्रहाच्या पंधरा-वीस आवृत्त्या निघाल्या. त्यावरून या लोकप्रियतेचे स्वरूप ध्यानात येते. महाराष्ट्रातील अनेक गावांशी त्यांचा जसा काव्यवाचनाच्या निमित्ताने संबंध आला तसा तो कोल्हापूरशी देखील आला. या भूमीविषयी त्यांच्या मनात आदराची भावना वसत होती.
सन १९६० च्या दशकानंतर विंदा करंदीकर, वसंत बापट आणि मंगेश पाडगावकर यांनी राज्यात काव्यवाचनाचे कार्यक्रम केले. या काळात ते कोल्हापुरात ते अनेकवेळा आले. विंदा करंदीकर हे येथील राजाराम महाविद्यालयात शिकले याचे पाडगावकर यांना मोठे कौतुक होते. शिवाजी विद्यापीठातदेखील पाडगावकर व्याख्यानानिमित्त आले होते. विद्यापीठाचे गीतही त्यांनी लिहिले होते. कोल्हापूर महापालिकेच्या व्याख्यानमालेअंतर्गत ते आले होते. केशवराव भोसले नाट्यगृहात त्यांची प्रकट मुलाखत झाली होती त्यावेळी सभागृह तुडुंब भरले होते. या मुलाखतीत त्यांनी बालपणापासूनच्या हृद्य आठवणी सांगितल्या. या कार्यक्रमानंतर त्यांनी अक्षरदालन ग्रंथ संग्रहालयास भेट दिली होती. कोल्हापुरातील विविध व्यक्तींशी ते संबंधित होते. कादंबरीकार बाबा कदम, कराडमधील श्रीनिवास कुलकर्णी यांच्या घरी हमखास जायचे. या दोन्ही कुटुंबीयांशी त्यांचे जवळचे संबंध होते. बऱ्याच वेळेस कादंबरीकार बाबा कदम यांच्या घरी ते मुक्कामाला असायचे. प्रा. गो. मा. पवार आणि डॉ. चंद्रशेखर जहागीरदार यांच्याकडे ते कार्यक्रमानिमित्ताने आल्यानंतर राहायचे. अरुण नाईक यांच्या विवाहास त्यांनी जे शुभेच्छा पत्र पाठविले होते. ते नाईक यांनी निमंत्रण पत्रिकेसाठी वापरले होते. आहार संस्कृती पाडगावकर यांचे खास असे प्रेम होते. मांसाहार विशेषत: मासे त्यांना आवडायचे. कोल्हापुरातही या प्रकारच्या भोजनाला ते अग्रक्रम द्यायचे. त्यांचे कोल्हापूरशी एक जिव्हाळ्याचे नाते होते.
- प्रा. डॉ. रणधीर शिंदे (मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)
मंगेश पाडगावकर यांचे कोल्हापूरशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनी माझ्या ‘रातवा’ आत्मचरित्राचे कौतुक केले होते. ते कोल्हापुरातील कार्यक्रमांना आवर्जून यायचे. त्यांचे साहित्य पूर्वीच्या आणि नव्या पिढीला प्रेरणादायी आहे. मराठी साहित्यविश्वाला त्यांनी समृद्ध केले. कविता जगायला शिकविणारे आणि स्वत: कविता जगणारे असे ते कवी होते. त्यांच्या निधनामुळे साहित्यक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
- चंद्रकुमार नलगे, ज्येष्ठ साहित्यिक
कवी पाडगावकर हे रसरशीत आयुष्य जगले. ते ऊर्जेचा स्रोत होते. त्यांना भेटल्यानंतर आश्वासक वाटत होते. त्यांच्या कविता या सकारात्मकपणे जगायला शिकविणाऱ्या होत्या. त्यांच्या निधनामुळे अतीव दु:ख झाले आहे. - अरुण नाईक, साहित्यिक
कवी पाडगावकर हे माझ्या दृष्टीने प्रेमाचा वटवृक्ष होते. त्यांनी स्वत:वर प्रेम केले, तसेच इतरांवर प्रेम करायला शिकविले. त्यांच्या कविता मनाला भावणाऱ्या होत्या. त्यांच्या निधनामुळे प्रेमाच्या वटवृक्षाला आम्ही मुकलो आहोत.
- निलांबरी कुलकर्णी, कवयित्री
मंगेश पाडगावकर हे अत्यंत संवेदनशील व खऱ्या अर्थाने माणूसपण जपणारे साहित्यिक क्षेत्रातील एक तारा होते. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचा ‘हृदयस्पर्शी व्यासपीठा’तर्फे सत्कार केला होता. त्यांच्या कविता, साहित्य हे आजच्या पिढीला मार्गदर्शक ठरणारे आहे.
- पद्माकर कापसे, अध्यक्ष, हृदयस्पर्शी हौशी सांस्कृतिक व्यासपीठ