कोल्हापूरात ‘पद्मावत’ चित्रपटाचे पोस्टर उतरविले, बंदोबस्तात प्रदर्शन, इचलकरंजीत चित्रपट पाडला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 04:22 PM2018-01-25T16:22:37+5:302018-01-25T17:13:00+5:30

कोल्हापूरातील हिंदुत्त्ववादी संघटनांनी बहुचर्चित संजय लिला भन्साळी निर्मित ‘पद्मावत’ चित्रपटाला विरोध केल्यानंतर त्यांच्या विनंतीला मान देऊन चित्रपटगृह चालकांनी गुरुवारचा पहिला शो रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात हा चित्रपट कोल्हापूर जिल्ह्यात सुरळीतपणे प्रदर्शित झाला. दरम्यान, इचलकरंजी शहरातील राधाकृष्ण चित्र मंदिर येथे प्रदर्शित झालेला पद्मावत चित्रपट हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बंद पाडला. यावेळी आंदोलकांनी निदर्शने केली. त्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. शहरातील तीन चित्रपटगृहात हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला. तीनही ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पहिल्याच ठिकाणी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने इतर ठिकाणी चित्रपट सुरू राहिला.

'Padmavat' poster removed from Kolhapur, showcased in Ichalkaranji film | कोल्हापूरात ‘पद्मावत’ चित्रपटाचे पोस्टर उतरविले, बंदोबस्तात प्रदर्शन, इचलकरंजीत चित्रपट पाडला बंद

कोल्हापूरातील पार्वती मल्टिप्लेक्स येथे गुरुवारी पोलीस बंदोबस्तात बहुचर्चित ‘पद्मावत ’ चित्रपट प्रदर्शित झाला. (छाया : दीपक जाधव)

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापूरात बंदोबस्तात ‘पद्मावत’चे प्रदर्शनइचलकरंजीत चित्रपट पाडला बंद, आंदोलकांची निदर्शनेथिएटर मालकांनी पहीला शो केला रद्द, पोस्टर उतरविलेप्रथमच गुरुवारी प्रदर्शित

कोल्हापूर /इचलकरंजी : कोल्हापूरातील हिंदुत्त्ववादी संघटनांनी बहुचर्चित संजय लिला भन्साळी निर्मित ‘पद्मावत’ चित्रपटाला विरोध केल्यानंतर त्यांच्या विनंतीला मान देऊन चित्रपटगृह चालकांनी गुरुवारचा पहिला शो रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात हा चित्रपट कोल्हापूर जिल्ह्यात सुरळीतपणे प्रदर्शित झाला. पार्वती मल्टिप्लेक्सच्या चालकांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या आवाहनानुसार पद्मावत चित्रपटाचे पोस्टर उतरविले. त्यानंतर पहिला शो रद्द केला. यावेळी चित्रपटगृहमालकांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करुन दुसऱ्या शोपासून चित्रपट प्रदर्शित केला.

इचलकरंजीत पद्मावत चित्रपटाचा खेळ बंद पाडण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. (छाया : उत्तम पाटील)

दरम्यान, इचलकरंजी शहरातील राधाकृष्ण चित्र मंदिर येथे प्रदर्शित झालेला पद्मावत चित्रपट हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बंद पाडला. यावेळी आंदोलकांनी निदर्शने केली. त्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. शहरातील तीन चित्रपटगृहात हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला. तीनही ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पहिल्याच ठिकाणी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने इतर ठिकाणी चित्रपट सुरू राहिला.

हिंदुत्त्वावादी संघटनांनी कोल्हापूरात हा चित्रपट बंद पाडण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी सांयकाळी हिंदुत्त्वावादी संघटना, चित्रपटगृह मालक यांची बैठक शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या कार्यालयात झाली. यात चित्रपटगृह मालकांनी हिंदुत्त्ववादी संघटनेच्या विनंतीला मान देत गुरुवारी सकाळचा पहीला शो रद्द करण्याचे मान्य केले.

त्यानूसार कोल्हापूरातील ज्या ज्या ठिकाणी पद्मावत चित्रपट प्रदर्शित होणार होता. त्या ठिकाणचे पहिले सर्व शो रद्द करण्यात आले. यात ज्या चित्रपट गृहात सिंगल स्क्रीन आहे. त्यांनी सकाळी साडेबाराचा शो रद्द केला. यात शहरातील प्रभात , पद्मा , उर्मिला , रॉयल, गणेश (गांधीनगर), तर मल्टिप्लेक्स असलेल्या पार्वती, आयनॉक्स, पीव्हीआर या चित्रपटगृहातील सकाळी ८:४० चे पहिले शो रद्द केले होते. यानंतर सकाळी ९ :३० चे सर्व शो पोलिस बंदोबस्तात सुरळीत पार पडले. प्रथमच गुरुवारी हा चित्रपट प्रदर्शित झाल्याने शुक्रवारी, शनिवारी , रविवारी असे सलग तीन दिवस चित्रपटाचे आगावू आरक्षण होत आहे.

कोल्हापूरकरांना उत्सुकता

या चित्रपटातील काही दृश्याचे चित्रिकरण किल्ले पन्हाळगडालगतच्या मसाई पठारवर झाले होते. यात अज्ञात युवकांनी या ठिकाणचे सेट जाळून टाकले. त्यात चित्रपट निर्मात्यांचे कोट्यावधीचे नुकसान झाले. विशेष बाब म्हणजे जी दृश्ये चित्रीत करण्यात आली त्याचे काम सुमारे महिनाभर सुरु होते. त्यामुळे कोल्हापूरातील सुमारे ६००हून अधिक कलाकार व तंत्रज्ञांना काम मिळाले होते. या पार्श्वभूमीवर या चित्रपटाबद्दल कोल्हापूरकर चित्रपट रसिकांमध्ये मोठी उत्सुकता होती. चित्रपट पाहील्यानंतर यात वापरण्यात आलेले तंत्रज्ञान, चित्रिकरणाबाबत अनेकांनी समाधान व्यक्त केले.

इचलकरंजीत ‘पद्मावत’ चा एक खेळ बंद पाडला, पोलिसांनी घेतले आंदोलकांना ताब्यात

दरम्यान, इचलकरंजी येथील तीन चित्रपटगृहांमध्ये पद्मावत हा चित्रपट गुरूवारी प्रदर्शित झाला. दरम्यान, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी सकाळी बारा वाजता राधाकृष्ट चित्रमंदिर येथील खेळ बंद पाडला. यावेळी निदर्शने करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे अन्य दोन चित्रपटगृहांतील खेळ सुरू राहिला. तीनही चित्रपटगृहांसमोर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पद्मावत या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून सुरूवातीपासूनच तीव्र विरोध होत आहे. त्याचे सर्वत्र पडसाद उमटत आहेत. चित्रपटामध्ये महाराणी पद्मावती यांचे विकृत चित्रण केल्याचा आक्षेप घेत आंदोलनकर्त्यांनी हा चित्रपट प्रदर्शित होवू देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे निर्मात्याने चित्रपटाचे नाव, तसेच त्यातील आक्षेपार्ह दृश्य कट करून चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी मिळावी. त्यानुसार गुरूवारी शहरातील भाग्यरेखा, राधाकृष्ण व फॉर्च्युन अशा तीन चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.

चित्रपट पाहिल्यानंतर कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह दृश्य नव्हते. चित्रपटातून इतिहास समजण्यास मदत होईल. विशेष म्हणजे मी संजय लिला भन्साळीच्या सर्व चित्रपटांची फॅन आहे.
- गायत्री गोरे,
चित्रपट रसिक


वादविवाद करण्यासारखे काहीच या चित्रपटात नाही. उच्च दर्जाचे चित्रिकरण, दृश्ये, आधुनिक तंत्रज्ञान हे या चित्रपटातून पाहिला मिळाले.
- प्रज्वल पाटील,
चित्रपट रसिक
 

चित्रपटातील काही भागाचे चित्रिकरण मसाई पठारावर झाले. त्यामुळे महिनाभर कोल्हापूरातील ६०० हून अधिककलाकार, तंत्रज्ञ आदींना काम मिळाले. कोल्हापूरकरांच्या दृष्टीने ही महत्वाची बाब आहे.
- मिलिंद अष्टेकर,
चित्रपट निर्मिती व्यवस्थापक

Web Title: 'Padmavat' poster removed from Kolhapur, showcased in Ichalkaranji film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.