पद्मिनी राऊत, मेरी गोम्समध्ये रस्सीखेच
By admin | Published: November 4, 2014 12:43 AM2014-11-04T00:43:22+5:302014-11-04T00:43:52+5:30
राष्ट्रीय महिला बुध्दिबळ : फक्त अर्ध्या गुणाची आघाडी; पटावर वर्चस्वासाठी धडपड
सांगली : ओरिसाची ग्रॅण्डमास्टर पद्मिनी राऊत व पश्चिम बंगालची ग्रॅण्डमास्टर मेरी गोम्स या दोघींनी विजेतेपदासाठी प्रबळ दावा केल्याने आज पटावरील हालचालींना वेग आला. पद्मिनीने साडेसात, तर मेरीने सात गुणांची कमाई केली. दोघींमध्ये केवळ अर्ध्या गुणाचा फरक आहे. पटावर वर्चस्व मिळवण्यासाठी दोघींची धडपड सुरू आहे.
पराभवाच्या गर्तेतून जोरदार मुसंडी मारून मेरीने पद्मिनीला थेट आव्हान दिले आहे. सलग चार दिवस विजयाची नोंद करणाऱ्या पद्मिनीची आता कसोटी लागणार आहे. गोव्याची ग्रॅण्डमास्टर भक्ती कुलकर्णी व ओरिसाची पद्मिनी यांच्यातील डाव ग्रुनफिल्ड डिफेन्स प्रकाराने सुरू झाला. भक्तीने मध्यपर्वापर्यंत पटावर एकतर्फी वर्चस्व निर्माण केले होते. उंट व घोड्याच्या बदल्यात दोन उंटांचा सुरेख वापर करत भक्तीने एक प्यादे मिळवून आपली स्थिती मजबूत केली. अनुभवी पद्मिनीने कौशल्यपूर्ण बचाव केला. ३९ व्या चालीला भक्तीने राजाची चुकीची चाल केली; मात्र याचा फायदा पद्मिनी उठवू शकली नाही. अखेर हत्ती व उंटाच्या अंतिम पर्वात ५३ व्या चालीनंतर डाव बरोबरीत सुटला.
केरळची नीमी जॉर्ज व पश्चिम बंगालची मेरी गोम्स यांच्यातही तगडा मुकाबला झाला. सिसिलीयन नॉजदार्फ ओपनिंगने डाव सुरू झाला. डावाच्या मध्य पर्वात नीमीच्या कुमकुवत चालींचा फायदा उठवत मेरीने मजबूत स्थिती धारण केली. अंतिम पर्वात नीमीची बचावफळी खिळखिळी झाली. ४९ व्या चालीनंतर नीमीने शरणागती पत्कारली.
आंध्रची हिंदुजा रेड्डी व महाराष्ट्राची स्वाती घाटे यांच्यात रंगतदार लढत झाली. दोघींनीही तोडीस तोड खेळ्या करून एकमेकींना रोखून धरले. स्वातीने ३० व्या चालीस प्याद्याची, तर ३२ व्या चालीस हत्तीची चाल केल्याने हिंदुजाची पटावरील स्थिती मजबूत झाली होती. ४२ व्या चालीस स्वातीने राजाची चुकीची खेळी केली. हिंदुजाचा विजय निश्चित होता, मात्र ४३ व्या चालीस हिंदुजाने प्याद्याने उंट मारून घोडचूक केली. त्यामुळे हा डाव बरोबरीत सुटला.
तमिळनाडूच्या विजयालक्ष्मीने आंध्रच्या लक्ष्मी प्रणिताला ३३ व्या चालीला पराभूत केले. तमिळनाडूच्या व्ही. वर्शिनाने गोव्याच्या इव्हाना फुर्ताडोला ४४ व्या चालीस पराभूत केले. पेट्रोलियम स्पोर्टस् बोर्डाच्या नीशा मोहोताने चमकदार खेळ करत आंध्रच्या पृथुषा बोडाला ३८ व्या चालीस पराभूत केले.
नूतन बुध्दिबळ मंडळातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नवव्या फेरीचे उद्घाटन डॉ. ऋता कुलकर्णी यांच्याहस्ते पटावरील चाल खेळून झाले. यावेळी चिंतामणी लिमये, प्रा. माधुरी कात्रे, प्रा. अतुल इनामदार, डॉ. गोविंद कुलकर्णी, प्रमोद चौगुले, दीपक वायचळ, भरत चौगुले आदी उपस्थित होते. (क्रीडा प्रतिनिधी)