पद्मिनीची विजेतेपदाकडे घोडदौड
By admin | Published: November 2, 2014 11:34 PM2014-11-02T23:34:09+5:302014-11-02T23:52:33+5:30
राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धा : ग्रँडमास्टर स्वाती घाटेने खाते उघडले
सांगली : विजयाची हॅट्ट्रिक नोंदवणाऱ्या ओडिशाची ग्रँडमास्टर पद्मिनी राऊतने स्पर्धेचा आज, रविवारचा दिवसही गाजवला. तमिळनाडूची आंतरराष्ट्रीय मास्टर विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यमला पराभूत करून पद्मिनीने सात गुणांची कमाई केली. अग्रमानांकित खेळाडूंचा धुव्वा उडवत पद्मिनीने विजेतेपदाकडे घोडदौड केली. पद्मिनीचा मुकाबला आज तमिळनाडूच्या विजयालक्ष्मीशी झाला. रॉलयोपेझ ओपनिंगने डाव सुरू झाला. दोघींनी एकमेकींना रोखून धरले. हत्ती, घोडा व प्याद्याच्या अंतिम पर्वात पद्मिनीने उत्कृष्ट चाली रचत विजयालक्ष्मीवर दबाव निर्माण केला. ५३ व्या चालीला विजयालक्ष्मीने पराभव मान्य केला. पश्चिम बंगालची ग्रँडमास्टर मेरी गोम्सने आज जोरदार मुसंडी मारली. मेरी विरुद्ध आंध्रची हिंदुजा रेड्डी यांच्यात तगडा मुकाबला झाला. सीमट्रीकल इंग्लिश ओपन प्रकाराने डाव सुरू झाला. १८ व्या चालीस हिंदुजाने प्याद्याची कुमकुवत चाल केली. १९ व्या चालीस मेरीने उंटाचे बलिदान देऊन हिंदुजावर जोरदार आक्रमण केले. गोंधळलेल्या हिंदुजाने पुन्हा चुकीची खेळी केल्यामुळे मेरीची स्थिती मजबूत झाली. ३६ व्या चाली नंतर हिंदुजाने पराभव मान्य केला. मेरीप्रमाणेच पराभवाच्या छायेत असलेल्या महाराष्ट्राची ग्रँडमास्टर स्वाती घाटेने आज पहिल्यांदा विजयाची नोंद करत खाते उघडले. गोव्याची ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णी विरुद्ध स्वाती यांच्यात सामना झाला. स्कॅनडिनेव्हीन ओपनिंगने डाव सुरू झाला. डावाच्या मध्यात स्वातीने मजबूत चाली रचत पटावर प्रभुत्व मिळवले. २८ व्या चालीस भक्तीने उंटाची चुकीची चाल केली; मात्र त्याचा फायदा स्वाती घेऊ शकली नाही. ३१ व्या चालीस भक्तीला प्याद्याची मारामारी करण्याची घाई नडली. त्यामुळे स्वातीला पटावर विजयाची चांगली संधी निर्माण झाली. पराभव अटळ आहे, हे ओळखून भक्तीने ३२ व्या चालीस डाव सोडला.
ओडिशाची पद्मिनी राऊत आणि तमिळनाडूची विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यम यांच्या लढतीतील एक चुरशीचा क्षण.