आंदोलकांचा रस्त्यावर पाडवा
By Admin | Published: March 22, 2015 12:39 AM2015-03-22T00:39:46+5:302015-03-22T00:39:49+5:30
अभयारण्यग्रस्तांचे आंदोलन सुरु : संवेदनशील मनाला स्पर्श; उद्या वनविभागावर मोर्चा
कोल्हापूर : दुसऱ्यांच्या सुखासाठी आपल्या जमिनी देऊन हक्काच्या पुनर्वसनासाठी आंदोलन कराव्या लागणाऱ्या चांदोली अभयारण्यग्रस्तांना शनिवारी गुढीपाडवाही रस्त्यावरच करावा लागला. सर्वजण आपल्या घरात कुटुंबीयांसमवेत हा सण साजरा करीत असताना आंदोलकांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पाडवा या मार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या संवेदनशील मनाला स्पर्श करणारा होता. आपल्या हक्काच्या मागणीसाठी त्यांची ही जिद्द वाखाणण्यासारखी आहे.
सोमवारी (दि.२३) वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय झाला. सहाव्या दिवशीही बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू होेते. चांदोली अभयारण्यातील व्याघ्र प्रकल्पामुळे बाधित झालेल्या सात गावांतील कुटुंबांना पर्यायी जमिनी मिळाव्या, शाहूवाडी तालुक्यातील उखळूपैकी अंबाईवाडीचे ठरल्याप्रमाणे खास पुनर्वसन व्हावे, या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने सोमवारपासून बेमुद ठिय्या आंदोलन सुरूआहे. ऊन, वाऱ्याची तमा न बाळगता प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरू आहे. प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने शनिवारी आंदोलन सुरू असलेल्या मंडपासमोरच गुढी उभारण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार शनिवारी अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. यावेळी झालेल्या निर्णयामध्ये सोमवारी ताराबाई पार्क येथील वनविभागाच्या कार्यालयावर १२ वाजता मोर्चा काढून जाब विचारण्यात येणार आहे. जमिनीच्या निर्वणीकरणाचा प्रस्ताव फक्त मंजुरीसाठी व वारणेच्या लाभक्षेत्रातील जमिनी संपादनासाठी लागणारे पैसे व नागरी सुविधांसाठी लागणारे पैसे, बुडीत झालेल्या गावांच्या ताळीचे व घराचे, जमिनींचे पैसे मिळण्यासाठी येथील कर्मचाऱ्यांनी तातडीने मंत्रालयात जाऊन स्वत: बसून गुरुवार (दि.२६)पर्यंत बैठकीचे आयोजन करावे, अन्यथा शुक्रवारी (दि.२७) चांदोली अभयारण्याकडे जाणाऱ्या आंबाईवाडी व शिराळा तालुक्यातील खानेलपूर या दोन्ही फाटकावरून एकाही पर्यटकाला आत जाऊ दिले जाणार नाही. त्याचबरोबर जंगल व जंगली प्राण्यांचे प्रमाण वाढले पाहिजे म्हणून अभयारण्यग्रस्तांना तेथून हलविण्यात आले; परंतु तेथे आता जंगल व प्राणी वाढले का? गवा आणि इतर प्राणी जंगलात चांगले खाद्य मिळत नाही म्हणून का बाहेर येतात? याचा जाब शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाला ३१ मार्चला सकाळी ११ वाजता मोर्चा काढून विचारणार आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष मारुती पाटील, डी. के. बोडके यांच्यासह आंदोलक उपस्थित होते. (प्रतिनिधी)