कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 02:37 AM2018-03-29T02:37:01+5:302018-03-29T02:37:01+5:30
पंढरपूर आणि शिर्डीच्या धर्तीवर कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याची तरतूद असलेले
मुंबई : पंढरपूर आणि शिर्डीच्या धर्तीवर कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याची तरतूद असलेले विधेयक विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले.
या मंदिरात पगारी पुजारी नेमण्याबाबतचे विधानसभा विधेयक संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी विधानसभेत मांडले होते.बुधवारी त्यावर चर्चा होऊन ते एकमताने मंजूर करण्यात आले.
या पगारी पुजाऱ्यांमध्ये ५० टक्के पुजारी या महिला असतील अशी तरतूदही विधेयकात करण्यात आली आहे. .छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या शाहू वैदिक स्कूलला मंदिर व्यवस्थापन समिती पूर्ण मदत करणार आहे.श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर विश्वस्त व्यवस्था,कोल्हापूर अशी विश्वस्त व्यवस्थाही स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी सभागृहात दिली.
आज मंजूर झालेल्या विधेयकानुसार आता पगारी पुजारी नेमण्यात येतील.पूजा करणाºया व्यक्तींचे अनुवांशिक,संविदाकृत अधिकार नाहीसे होणार आहेत. मात्र असे वंशपरंपरागत अधिकार संपुष्टात आलेल्या व्यक्तीला ९० दिवसांत भरपाईच्या रकमेसाठी जिल्हा न्यायालयाकडे अर्ज करता येईल.नुकसानभरपाईसाठीचे सरासरी उत्पन्न हे नियमाच्या दिनांकापुर्वीच्या मागील दहा वर्षांच्या उत्पन्नाच्या आधारे निर्धारित करण्यात येणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या जमिनींसंदर्भात फॉरेन्सिक अंकेक्षण पूर्ण झाले असून याबाबतचा अहवाल लवकरच सभागृहात सादर करण्यात येणार असल्याची माहितीही डॉ.रणजित पाटील यांनी दिली.
मंदिर विश्वस्त व्यवस्थापन समिती
मंदिर विश्वस्त व्यवस्थेचे व्यवस्थापन करण्यासाठी श्री अंबाबाई मंदिर व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येणार आहे.या समितीत एकूण आठ सदस्य असतील. कोल्हापूरचे महापौर हे या समितीचे पदसिद्ध सदस्य असतील.
क्षीरसागर यांच्या सूचना
शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांनी यावेळी काही महत्वाचे मुद्दे मांडले. पंढरपूर येथे रूख्मिणी मातेची पूजा महिला पुजा-यांकडून केली जाते.अंबाबाई देखील मातृदेवता असल्याने तिचीही पूजा महिला पुजाºयांकडून करण्यात यावी.तसेच छत्रपती शाहू महाराजांनी पूजाविधी स्कूलची स्थापना केली होती.या शाळेतून पुजाºयांची नेमणूक करण्यात यावी.पुजाºयांनी आतापर्यंत कोटयवधी रूपयांचे उत्पन्न मिळविले आहे त्यांना नुकसानभरपाई देण्याची गरज नाही आदी मागण्या त्यांनी यावेळी केल्या.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमधील जमिनीबाबत मी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.मुख्यमंत्रयांनी त्याची एसआयटी चौकशीही घोषित केली होती त्याचे काय झाले असा प्रश्नही क्षीरसागर यांनी विचारला.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातील सर्व हिंदूंच्या मंदिरांमध्ये पुजारी नेमताना काही अटी शर्ती ठेवाव्यात व परीक्षा घेउन त्यांची नेमणूक करण्यात यावी व सर्व जातींच्या व्यक्तींना पुजारी होण्याची मुभा असावी अशी सूचना केली.