कलागुणांच्या उधळणीत रंगली तरुणाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:27 AM2017-09-27T00:27:12+5:302017-09-27T00:27:16+5:30

The painting of artistic excitement | कलागुणांच्या उधळणीत रंगली तरुणाई

कलागुणांच्या उधळणीत रंगली तरुणाई

Next



संतोष मिठारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गारगोटी : डोलायला लावणारी लोकनृत्यं, अत्याधुनिक संगीत साधनांच्या साथीने रंगलेले पाश्चिमात्य गायन, सूरमयी सफर घडविणारे शास्त्रीय सूरवाद्य, भारतीय गायन परंपरेची झलक घडविणारे समूहगायन, अशा विविध कलागुणांच्या उधळणीत शिवाजी विद्यापीठाच्या ३७ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवात मंगळवारी तरुणाई रंगली. सायंकाळी सुमारे दीड तास जोरदार पाऊस झाल्याने लोकनृत्याचा प्रारंभ लांबला. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत ही स्पर्धा सुरू होती.
गारगोटी (ता. भुदरगड) येथील श्री मौनी विद्यापीठाच्या प्रागंणात स्पर्धक, साथीदार, समर्थक, अशा विविध भूमिकांतून युवक-युवतींनी महोत्सवाचा आनंद लुटला. महात्मा फुले सदनातील सुगम गायन आणि ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रातील शास्त्रीय नृत्याने महोत्सवातील दुसºया दिवसाची सुरुवात झाली.
डॉ. व्ही. टी. पाटील मुख्य व्यासपीठावर सकाळी साडेअकराच्या सुमारास पाश्चिमात्य एकलगीत गायन सुरू झाले. यातील स्पर्धकांनी उपस्थितांना ताल धरायला लावला. रात्री देशाच्या कला-सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारी बहारदार लोकनृत्ये सादर झाली.
उत्सवाच्या नव्या रूपाचे दर्शन
टी. व्ही. आणि चित्रपटाव्यतिरिक्त मनोरंजनाच्या इतर साधनांचा संपर्क गारगोटीमध्ये कमी आहे. मात्र, या मध्यवर्ती महोत्सवाच्या माध्यमातून येथील नागरिकांना प्रत्यक्ष एकांकिका, लघुनाटिकांमधील अभिनय, नृत्य, गीत-संगीताची अनुभूती घेता आली. त्यांना या उत्सवाच्या नव्या रूपाचे दर्शन घडले.
‘सेल्फी’चा मोह
विविध गावे, शहरांतून आलेले युवक-युवती महोत्सवात रममाण झाले आहेत. आपल्या संघाबरोबरच नव्या मित्र-मैत्रिणींसमवेत अनेकांच्या गप्पा रंगल्या होत्या. निसर्गरम्य परिसरातील मौनी विद्यापीठाच्या आवारात ‘सेल्फी’ घेण्याचा मोह अनेक युवक-युवतींना आवरता आला नाही. सेल्फी घेतल्यानंतर तो लगेचच आपल्या फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपच्या प्रोफाईलवर अनेकांनी झळकविला. स्पर्धेत सहभागी असलेल्या तरुणाईचा मिळेल त्याठिकाणी सराव सुरू होता.
आज समारोप
कलाविष्काराचा जागर असणाºया या महोत्सवाचा आज, बुधवारी दुपारी दोन वाजता श्री मौनी विद्यापीठाचे अध्यक्ष, आमदार सतेज पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप होणार आहे.

Web Title: The painting of artistic excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.