कोल्हापूर जिल्ह्यात पाक ध्वज जाळला, ठिकठिकाणी निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 02:04 PM2019-02-15T14:04:36+5:302019-02-15T14:05:43+5:30
जम्मु-काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्या झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी निषेधाचे मोर्चे काढण्यात येत असून शिवसेनेने शुक्रवारी दुपारी मिरजकर तिकटीवर पाकिस्तानचा ध्वज जाळला.
कोल्हापूर :जम्मु-काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्या झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी निषेधाचे मोर्चे काढण्यात येत असून शिवसेनेने शुक्रवारी दुपारी मिरजकर तिकटीवर पाकिस्तानचा ध्वज जाळला.
काल सायंकाळपासूनच नागरिकांचा संताप अनावर झाल्याचे चित्र पहावयास मिळत होेते. सकाळपासून अनेक गावांमध्ये पाकिस्तानचा पुतळा,ध्वज जाळण्यापासून ते शहीदांना श्रध्दांजली वाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून येत होते. तालुका पातळीवरही अनेक ठिकाणी या हल्ल्याचा तीव्र निषेध होत असून आता भारताने पाकिस्तानला अ्ददल घडवावी असा सूर व्यक्त होत आहे.
कोल्हापुरात सकाळी जनशक्तीच्यावतीने बिंदू चौकामध्ये कार्यकर्त्यांनी एकत्र येत या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. त्यानंतर मिरजकर तिकटीवर शिवबांचा मावळा संघटनेच्यावतीने पाकिस्तानचा पुतळा जाळण्यात आला. यावेळी जय भवानी, जय शिवाजी घोषणांनी चौक दुमदुमून गेला.यानंतर शिवसेनेच्यावतीने पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला.
आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे संचालक शिवाजीराव जाधव, सुजित चव्हाण, सुभाष वोरा, समीर नदाफ, आदिल फरास, ईश्वर परमार, अमोल माने, विनोद जाधव यांच्यासह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.