जोतिबा मंदिरात आज पाकाळणी साजरी होणार, यात्रेची जय्यत तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 11:57 AM2023-03-20T11:57:03+5:302023-03-20T11:57:22+5:30
नवरात्रोत्सवाच्या प्रारंभ आणि चैत्र यात्रेपूर्वी व नंतर अशा तीन पाकाळणी साजरी करून मंदिर स्वच्छ केले जाते
जोतिबा : चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर जोतिबा मंदिरात पाकाळणी साजरी करून मंदिर स्वच्छ करण्यात येणार आहे. जोतिबा डोंगरावर ५ एप्रिला चैत्र पौर्णिमा यात्रा होणार आहे. यात्रेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. सोमवारी जोतिबा मंदिराची स्वच्छता करण्यात येणार आहे. स्वच्छ पाण्याचे फवारे मारून मंदिराची स्वच्छता केली जाईल. सकाळी मंदिरात स्थानिक पुजारी, खंडकरी जोतिबा महादेन, नंदी, चोपडाई काळभैरव, यमाई मंदिरातील देवता कृत्य साहित्याची स्वच्छता करतील.
अंर्तबाह्य मंदिराची स्वच्छतेला आध्यात्मिक क्षेत्रात पाकाळणी करणे असे म्हणतात. मंदिरात वर्षातून तीन वेळा पाकाळणी साजरी केली जाते. नवरात्रोत्सवाच्या प्रारंभ आणि चैत्र यात्रेपूर्वी व नंतर अशा तीन पाकाळणी साजरी करून मंदिर स्वच्छ केले जाते. दीपमाळ, दगडी कमान, शिखरे, सदर यांच्यावर पाण्याचे फवारे मारले जातात. पालखी, धुपारती सोहळ्याचे साहित्यांची स्वच्छता केली जाते.
चैत्र यात्रेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. मंगळवारपासून मंदिराची रंगरंगोटी केली जाणार आहे. पाकाळणीमुळे मंदिरातील धार्मिक विधी कार्यात बदल होतील. अभिषेक दुपारी १२ नंतर होईल. सकाळी ७ दुपारी १२ पर्यंत मंदिरात स्वच्छता होणार असल्याने दुपारनंतरच भाविकांनी दर्शनास यावे, असे आवाहन देवस्थान समितीचे मंदिर व्यवस्थापक दीपक म्हेत्तर यांनी केले आहे.