कोल्हापूरकरांच्या जेवणात पाकिस्तानचा मिठाचा ‘खडा’, सैंधव मीठ म्हणून विक्री 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 04:10 PM2023-07-12T16:10:57+5:302023-07-12T16:11:34+5:30

सैंधव मीठ हे आयुर्वेदिक असून, जेवण बनविण्यासाठी हे मीठ उपयुक्त असल्याचा विक्रेत्यांचा दावा

Pakistan salt in the food of Kolhapur, sold as Saindhava salt | कोल्हापूरकरांच्या जेवणात पाकिस्तानचा मिठाचा ‘खडा’, सैंधव मीठ म्हणून विक्री 

कोल्हापूरकरांच्या जेवणात पाकिस्तानचा मिठाचा ‘खडा’, सैंधव मीठ म्हणून विक्री 

googlenewsNext

कोल्हापूर : पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील खाणींमध्ये तयार होणाऱ्या सैंधव मिठाची सध्या कोल्हापूर शहरातील विविध भागांमध्ये विक्री केली जात आहे. राजस्थानमधील पाच ते सहा विक्रेते टेंबलाई मंदिराजवळील उचगाव रस्त्यावर ट्रॅक्टरमधून या मिठाची विक्री करीत आहेत. बीपी, शुगर, मुतखड्यावर सर्वांत गुणकारी म्हणून याची जाहिरात केल्याने ‘आहे स्वस्त, आरोग्यालाही मस्त’ला भुरळून खरेदीसाठी कोल्हापूरकरांच्या उड्या पडत आहेत. 

मात्र, मोठमोठ्या दगड स्वरूपात उघड्यावर विक्रीसाठी ठेवलेले हे मीठ खरेच सैंधव आहे का, आरोग्याला चांगले आहे का, त्याची शुद्धता किती? याची अन्न व औषधी प्रशासनाकडून तपासणी होणे गरजेचे आहे. तांबूस रंगाचे सैंधव व राजस्थानमध्ये जडीबुटीतून तयार केलेल्या काळ्या मिठाची विक्री केली जात आहे. सैंधव मीठ ६०, तर काळे मीठ ७० रुपये दराने विक्री केली जाते. टेंबलाई मंदिराजवळ पाच ते सहा ट्रॅक्टर ट्रॉलीत दगडाच्या आकाराचे मिठाचे खडे ठेवण्यात आले आहेत.

पाकच्या सिंध प्रांतामधून अमृतसरमध्ये पुरवठा

पाकिस्तानातील सिंध प्रांतात सैंधव मिठाच्या खाणी आहेत. हे मीठ आरोग्याला चांगले असल्याने भारतासह जगभरात त्याला मागणी आहे. सिंध प्रांतामधून पंजाबच्या अमृतसरमध्ये त्याचा पुरवठा केला जातो. त्यानंतर राजस्थानमधील विक्रेते देशभरात त्याची विक्री करतात.

विक्रेत्यांचा दावा

सैंधव मीठ हे आयुर्वेदिक असून, जेवण बनविण्यासाठी हे मीठ उपयुक्त आहे. आरोग्याच्या सर्व तक्रारींवर हे मीठ गुणकारी असल्याचा दावा विक्रेते राहुल रजपूत यांनी केला. राजस्थानमध्ये तयार होणारे काळे मीठ पाणीपुरीसाठी वापरले जाते.

कोल्हापूर शहरात अशा मिठाची विक्री होत असेल तर या मिठाची तपासणी करण्यात येईल. - तुषार शिंगाडे, सहायक आयुक्त, अन्न व औषधी प्रशासन, कोल्हापूर

Web Title: Pakistan salt in the food of Kolhapur, sold as Saindhava salt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.