पाकिस्तानात साखरेचे अतिरिक्त उत्पादन! १५ लाख टन निर्यात करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:56 AM2017-12-10T00:56:37+5:302017-12-10T00:58:03+5:30

Pakistan's additional production of sugar! Export 1.5 million tons | पाकिस्तानात साखरेचे अतिरिक्त उत्पादन! १५ लाख टन निर्यात करणार

पाकिस्तानात साखरेचे अतिरिक्त उत्पादन! १५ लाख टन निर्यात करणार

Next
ठळक मुद्देप्रतिटन १०,७०० रुपये निर्यात अनुदानबाजारातील साखरेचे दर केव्हाही चढू अथवा उतरू शकतात.

चंद्रकांत कित्तुरे ।
कोल्हापूर : पाकिस्तानातही साखरेचे अतिरिक्त उत्पादन होण्याची शक्यता असल्याने १५ लाख टन साखर निर्यात करण्यास पाकिस्तान सरकारने मंजुरी दिली आहे. यासाठी प्रतिटन १० हजार ७०० रुपये निर्यात अनुदान दिले जाणार आहे. ही साखर भारतात निर्यात केली जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास भारतातील साखरेच्या किमती आणखी घसरतील, अशी शक्यता साखर उद्योगातील तज्ज्ञांमधून व्यक्त केली जात आहे.
जगात साखर उत्पादक देशांमध्ये पाकिस्तान नवव्या स्थानावर आहे. तेथे ३० नोव्हेंबरपासून साखर हंगाम सुरू झाला आहे. तेथे गतहंगामात ७० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. चालू हंगामात ते ८० लाख टनांवर जाण्याची शक्यता आहे. मागणीपेक्षा हे उत्पादन अतिरिक्त आहे.

यामुळे दर घसरून साखर उद्योग अडचणीत येऊ लागला आहे. यामुळे अतिरिक्त साखर निर्यात करण्याचा मार्ग पाकिस्तान सरकारने निवडला आहे. मंत्रिमंडळाच्या आर्थिक समन्वय समितीच्या बैठकीत प्रतिटन १० हजार ७०० रुपये निर्यात अनुदान देऊन १५ लाख टन साखर निर्यातीस मंजुरी दिली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचा दर सध्या ३७० अमेरिकन डॉलर प्रतिटनाच्या (२३,८५७ रुपये) आसपास आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे दर केव्हाही चढू अथवा उतरू शकतात. पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात निर्यात अनुदान दिले असल्याने व साखर निर्यातीस भारत हा पाकिस्तानला सोयीचा देश असल्याने ही साखर भारतात येण्याची शक्यता आहे. पाकिस्तानातून भारतात वाघा सीमेवरून रस्ते मार्गाने साखर पाठविता येऊ शकते. त्यामुळे वाहतुकीचा खर्च अतिशय कमी असतो.

आयात कर वाढविण्याची मागणी
भारतातही साखरेचा हंगाम जोरात सुरू आहे. पहिल्या दोन महिन्यांतच गतवर्षीच्या तुलनेत ४२ टक्के अधिक म्हणजेच ३९.५१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. या हंगामात मागणीपेक्षा जादा उत्पादन होण्याची शक्यता आहे. दरही उतरू लागले आहेत. तशातच पाकिस्तानातून साखर भारतात आली की, दर आणखी उतरतील आणि ते देशातील साखर उद्योग, ऊस उत्पादक यांच्यासाठी अडचणीचे ठरेल. यामुळे साखरेवरील आयात कर तातडीने ५० वरून ६० टक्के करावा, अशी मागणी आॅल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनने केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण खात्याचे सहसचिव (साखर) सुभाष पांडा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Pakistan's additional production of sugar! Export 1.5 million tons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.