पुरात अडकलेल्या गरोदर महिलांना वाचवले पैलवानाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:26 AM2021-07-29T04:26:02+5:302021-07-29T04:26:02+5:30
नुकत्याच येऊन गेलेल्या महापुरात गारगोटी येथील आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू केदार अशोक कांबळे या पैलवानाने स्वतःचा जीव धोक्यात घालून गरोदर महिला ...
नुकत्याच येऊन गेलेल्या महापुरात गारगोटी येथील आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू केदार अशोक कांबळे या पैलवानाने स्वतःचा जीव धोक्यात घालून गरोदर महिला आणि दोन माणसांचा जीव वाचवला. त्याच्या या धडसाबद्दल प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी त्याचे विशेष कौतुक केले आहेत.
गारगोटी-पाटगाव मार्गावर वक्रतुंड पेट्रोल पंप येथे गरोदर महिला अडकली असल्याची बातमी वाऱ्यासारखी गारगोटी शहरात पसरली. प्रशासन तिला आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन टीमची वाट पाहत असताना हीच बातमी गारगोटीतील पैलवान केदार कांबळे याच्या कानावर पडली. कसलाही विचार न करता केदार कांबळे याने महापुराच्या पाण्यात उडी मारली व तो पोहत अर्धा मैल अंतर असलेल्या पेट्रोल पंपावर पोहोचला. त्याने अडकलेल्या त्या गरोदर महिलेची व दोन नागरिकांची चौकशी केली. घाबरू नका, असे आवाहन करून आम्ही व प्रशासन आपल्यासोबत आहोत, असे त्यांना सांगून धीर दिला. पुन्हा तो पोहत गारगोटीच्या दिशेने येत होता. थोडे अंतर असताना लहान बोट घेऊन एक जण आला. ते दोघे बोटीत बसून माघारी गारगोटीमध्ये पोहोचले.
तेथील परिस्थितीची माहिती प्रशासनाला दिली. त्यावेळी प्रांताधिकारी डॉ. खिलारी हे पूरस्थळी हजर होते. यांनी त्याचे कौतुक करून पेट्रोल पंपावर कसा पोहोचलास? तोच मार्ग रेस्क्यू फोर्सला दाखवशील का? असे विचारताच तो एका पायावर तयार झाला. त्याने दाखविलेल्या मार्गाने महिलेस व दोन नागरिकांना सुखरूप गारगोटी येथे आणले. सर्वच स्तरातून या धाडसी युवकाचे कौतुक होत आहे.
केदार अशोक कांबळे हा गरीब शेतकरी कुटुंबातील युवक आहे. तो ४५ किलो वजन गटात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील सुवर्णपदक विजेता खेळाडू आहे. दोन वर्षांपूर्वी तो आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळून आला आहे. तेथे त्याने सुवर्णपदक पटकावले असून आता त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. गरिबीशी सामना करताना उराशी मात्र भारतीय नेव्हीमध्ये जाण्याचे स्वप्न बाळगले आहे. स्वप्नपूर्तीसाठी तो दररोज दोन तास पोहणे आणि तीस किलोमीटर अंतरापर्यंत सायकल चालवणे, संध्याकाळी कुस्तीचा व्यायाम अशी त्याची दिनचर्या आहे.
फोटो ओळ
पैलवान केदार कांबळे