पालिका जनता दरबारला गदी
By admin | Published: November 6, 2014 12:17 AM2014-11-06T00:17:41+5:302014-11-06T00:38:25+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाबाबत सर्वाधिक अर्र्ज
कोल्हापूर : महानगरपालिकेशी निगडित असलेली कामे व तक्रारी यांच्या निरसनासाठी आज, बुधवारी आयोजित केलेल्या जनता दरबाराला नागरिकांनी गर्दी केली होती. यात एकूण ७३ अर्ज महापालिका प्रशासनाकडे दाखल झाले. यातील सर्वाधिक ३८ अर्ज सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित आहेत.
महापालिकेकडून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जनता दरबाराचे आयोजन केले जाते. या महिन्यातील मंगळवारी, काल, शासकीय सुटी होती. त्यामुळे जनता दरबार आज, बुधवारी आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी महापौर तृप्ती माळवी होत्या. राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात सकाळी अकरा ते दुपारी दोनपर्यंत दरबार सुरू होता. यात एकूण ७३ अर्ज दाखल झाले. यात सार्वजनिक बांधकाम विभाग (३८ अर्ज), घरफाळा (६), पाणीपुरवठा (८), इस्टेट (४), सार्वजनिक आरोग्य (९), कामगार (२), प्रॉव्हिडंट फंड, परवाना, शिक्षण मंडळ, विद्युत, नगररचना, केएमटी विभागाशी संबंधित प्रत्येकी एका अर्जाचा समावेश होता. या दरबारात दाखल झालेल्या तक्रारींचे तातडीने निराकारण करण्यात यावे, अशा सूचना महापौर तृप्ती माळवी यांनी यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, उपमहापौर सचिन गोंजारे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण, परिवहन समिती सभापती वसंत कोगेकर, सभागृह नेता चंद्रकांत घाटगे, नगरसेवक महेश जाधव, सुभाष रामुगडे, उपायुक्त विजय खोराटे, अश्विनी वाघमळे, सहायक आयुक्त शीला पाटील, उमेश रणदिवे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
इच्छुकांकडून प्रशासन धारेवर
येत्या दहा महिन्यांत महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रभागातील समस्या घेऊन अनेक इच्छुकांनी आजच्या जनता दरबारासाठी हजेरी लावली होती. रस्ता, पाणी, कचरा, आदी प्रश्नांवर त्यांनी प्र्रशासनाला धारेवर धरले. समर्थकांसह आलेल्या इच्छुकांमुळे सभागृहात मोठी गर्दी झाली होती.