तळपत्या उन्हात ओळख परेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:18 AM2018-04-25T00:18:50+5:302018-04-25T00:18:50+5:30
कोल्हापूर : शहरात तापमानाचा पारा ४० च्यावर गेल्यांने अंगाची लाहीलाही होत असताना मंगळवारी भर दुपारी तळपत्या उन्हात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडील सर्व कर्मचाऱ्यांची तब्बल चार तास ओळख परेड घेण्यात आली. ओळख परेडच्या नावाखाली झालेल्या या सामुदायिक ‘शिक्षा’ परेडबाबत विशेषत: महिला कर्मचाºयांमधून तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली.
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचाºयांच्या नेमणुका प्रभागनिहाय करण्यात आलेल्या आहेत. काही प्रभागांत कमी, तर काही प्रभागात जादा कर्मचारी दिले असल्याचा संशय आहे. त्यामुळे स्थायी समिती सभापती आशिष ढवळे यांनी सर्वच कर्मचाºयांची ओळख परेड मंगळवारी बुद्धगार्डन येथील ‘के.एम.टी.’च्या यंत्रशाळेच्या आवारात ठेवली होती. यावेळी सर्व नगरसेवकांनाही उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या; परंतु अनेक नगरसेवकांनी त्याकडे पाठ फिरविली.
मंगळवारी सकाळी दहा वाजता येण्याच्या सूचना कर्मचाºयांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सर्व कर्मचारी दहा वाजण्याच्या सुमारास आले होते. प्रभागनिहाय कर्मचाºयांना भर उन्हात एकापाठोपाठ एक असे रांगेत उभे करण्यात आले होते. सुमारे १५३७ कर्मचाºयांची वैयक्तिक ओळख घेण्यात बराच वेळ लागत होता. त्यामुळे बहुतेक सर्वच कर्मचारी सुमारे चार तास उन्हात उभे होते. उन्हापासून बचाव करण्याकरिता काही पुरुष कर्मचाºयांनी डोक्यावर टोपी घातली होती. महिला कर्मचाºयांनी साडीचे पदर डोक्याला बांधले होते; तर काही कर्मचाºयांनी छत्रीचा उपयोग करून घेतला. सूर्याची किरणे डोक्यावर येतील तशी पन्नाशी ओलांडलेले कर्मचारी या कडाक्याच्या उन्हाने पुरते व्याकुळ झाले. त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आणि घसे कोरडे झाले. या ओळख परेडमध्ये महिला आणि काही आजारी कर्मचाºयांची भलतीच दमछाक झाली. कासाविस झालेला आपला जीव घेऊन आपली ओळख कधी घेतात याची प्रतीक्षा करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. कर्मचाºयांना साध्या पिण्याच्या पाण्याचीही सोय करण्यात आली नव्हती.
कर्मचाºयांना छळणाºया या ओळख परेडबद्दल अनेक कर्मचाºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. उन्हात अशा प्रकारे ओळख परेड घेणे म्हणजे माणसाला गुलामासारखे वागविण्याचा प्रकार असल्याची टीका अनेकांनी केली. महानगरपालिकेचे अनेक सांस्कृतिक हॉल आहेत. अशा एखाद्या हॉलमध्ये ओळख परेड ठेवली असती तर अशी छळवणूक झाली नसती, अशा भावना कर्मचाºयांनी व्यक्त केल्या.
६४ गैरहजर, प्रशासनाची नोटीस
स्थायी सभापती आशिष ढवळे, प्रभारी उपायुक्त मंगेश शिंदे, ताराराणी आघाडी गटनेते सत्यजित कदम, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड यांच्यासह काही नगरसेवकांच्या उपस्थितीत झालेल्या या ओळखपरेडला १७३४ पैकी १६७० कर्मचारी उपस्थित होते. त्यामध्ये झाडू, सफाई कर्मचारी, मुकादम यांचा समावेश होता. ६४ कर्मचारी गैरहजर होते. गैरहजर कर्मचाºयांना नोटीस देण्यात आली आहे.
ओळख परेडमध्ये
आढळलेल्या त्रुटी
काही प्रभागांत १० ते १२ कर्मचारी आणि काही भागात ३५ ते ४५ कर्मचारी काम करतात.
एका प्रभागात तर चक्क ४२ कर्मचारी काम करीत आहेत.
बसस्थानके, भाजी मार्केट यासारख्या परिसरांत कमी कर्मचाºयांची नियुक्ती.
आरोग्य विभागातील कर्मचारी आजारी, पॅरालेसिस झालेले असून त्यांची कार्यक्षमता संपलेली आहे.
आरोग्य कर्मचाºयांना २० ते २२ हजार पगार आणि त्यांच्या वरिष्ठ निरीक्षकास १० हजार मानधन.
पगारातील तफावतीमुळे कर्मचारी व निरीक्षकांत सेटिंगचा संशय.
प्रभागात असलेले काही कर्मचारी नगरसेवकांनी प्रथमच पाहिले.
कैदी समजू नका : शहा
सफाई कर्मचारी कैदी आहेत, असे समजून ओळखपरेड घेतली जाऊ नये. माझ्या भागातील सफाई कर्मचाºयांवर अनाधिकारपणे कोणी आक्षेप घेतला, तर मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहीन. माझ्या भागात कोणी ढवळाढवळ केलेली मला चालणार नाही, असा इशारा महिला व बाल कल्याण समिती सभापती सुरेखा शहा यांनी दिला आहे.