सराफ व्यवहारात ‘पॅन कार्ड’ सक्ती त्रासदायक
By admin | Published: January 20, 2016 12:57 AM2016-01-20T00:57:29+5:302016-01-20T01:04:11+5:30
दोन लाखांच्या खरेदीसाठी पॅन कार्ड गरजेचे : सुमारे ८० टक्के ग्राहकांकडे कार्ड नसल्याने अडचण, व्यवसायावर परिणाम
कोल्हापूर : दोन लाख रुपयांवरील सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांनी पॅन कार्ड क्रमांक देण्याची सक्ती सराफ व्यावसायिकांसह ग्राहकांना त्रासदायक ठरणारी आहे. सोने-चांदीची खरेदी करणाऱ्या सुमारे ८० टक्के ग्राहकांकडे पॅन कार्ड नसल्याने खरेदीचा व्यवहार करणे अडचणीचे ठरत आहे. अशा स्थितीत सर्वांना पॅन कार्ड दिल्याशिवाय केंद्र सरकारने व्यवहारात पॅन कार्ड क्रमांक देण्याची सक्ती करू नये, अशी मागणी सराफ व्यावसायिकांतून होत आहे. यासाठी आॅल इंडिया जेम्स अॅँड ज्वेलरी फेडरेशन व महाराष्ट्र सराफ सुवर्णकार महामंडळाच्या नेतृत्वाखाली गांधीगिरी मार्गाने आंदोलन सुरू केले आहे.
गेल्यावर्षी केंद्र सरकारने दोन लाख रुपयांवरील सोने-चांदी खरेदीसाठी पॅन कार्ड क्रमांक देणे बंधनकारक केले आहे. काळा पैसा रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. मात्र, प्रत्यक्षात या निर्णयाचे तोटे अधिक आहेत. देशातील सुमारे ८० टक्के व्यक्तींकडे अजून पॅन कार्ड नाहीत. ते लक्षात घेता, या निर्णयामुळे शेतकरी अथवा पॅन कार्ड नसलेल्या व्यक्तींना दोन लाखांवरील सोने-चांदीची खरेदी करणे त्रासदायक ठरणार आहे.
या निर्णयामुळे व्यवसाय कोलमडण्याची भीती सराफ व्यावसायिकांतून व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
दोन लाखांवरील खरेदीसाठी ग्राहकांकडून पॅन कार्ड क्रमांक, फॉर्म नंबर ६० व ६१ भरून घ्यावेत. तसेच सहा वर्षे हे रेकॉर्ड सांभाळावे, असे जाचक निर्णय सरकारने घेतले असून, ते ग्राहक आणि सराफ व्यावसायिकांना त्रासदायक ठरणारे आहे. त्याविरोधात गांधीगिरी पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे. दोन दिवसांत आॅल इंडिया जेम्स अॅँड ज्वेलरी फेडरेशन व महाराष्ट्र सराफ सुवर्णकार महामंडळाची मुंबईत बैठक होईल. तेथील निर्णयानुसार संबंधित जाचक निर्णयांविरोधात लढा दिला जाईल. दोन लाखांवरील खरेदीसाठी पॅन कार्ड क्रमांक घेण्याचा निर्णय चांगला आहे; पण सरकारने पहिल्यांदा सर्वांना पॅन कार्ड द्यावे. त्यानंतरच संबंधित निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी आमची मागणी आहे.
- भरत ओसवाल, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा सराफ संघ
खासदारांना आज निवेदन देणार
शेतीमालाला आयकर लागू नसल्याने शेतकरीवर्ग पॅन कार्ड काढत नाहीत. अनिवासी भारतीयांकडेही पॅन कार्ड असत नाही. यामुळे पॅन कार्ड नसलेल्या व्यक्तीला सोने-चांदीचे दागिने खरेदी करणे किंवा सराफाकडून विकले जाणे यावर बंधन आले असल्याचे कोल्हापूर जिल्हा सराफ व्यापारी संघाचे सचिव कुलदीप गायकवाड यांनी सांगितले. ते म्हणाले, केंद्र सरकारने संबंधित निर्णय घेतला असल्याने त्याविरोधात संसदेत आवाज उठणे आवश्यक आहे. त्यामुळे संघातर्फे आज, बुधवारी दुपारी खासदार धनंजय महाडिक यांना निवेदन दिले जाणार आहे.