पं. सुधाकरबुवा डिग्रजकर स्मृती संगीत महोत्सवात रागदारी गायकीची अनुभूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 04:42 PM2019-01-15T16:42:38+5:302019-01-15T16:53:12+5:30
पं. विनोद डिग्रजकर व गायिका भारती वैशंपायन यांच्या रागदारी गायकीने कोल्हापूरकर रसिकांना स्वर संगीताची अनुभूती दिली. निमित्त होतं ब्राह्मण सभा करवीर (मंगलधाम) आयोजित पं. सुधाकरबुवा डिग्रजकर स्मृती संगीत महोत्सवाचं.
कोल्हापूर : पं. विनोद डिग्रजकर व गायिका भारती वैशंपायन यांच्या रागदारी गायकीने कोल्हापूरकर रसिकांना स्वर संगीताची अनुभूती दिली. निमित्त होतं ब्राह्मण सभा करवीर (मंगलधाम) आयोजित पं. सुधाकरबुवा डिग्रजकर स्मृती संगीत महोत्सवाचं.
राम गणेश गडकरी हॉलमध्ये आयोजित या महोत्सवाच्या प्रथम सत्रात प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित विनोद डिग्रजकर यांचे सुरेल गायन झाले. त्यांनी राग धनकोणी कल्याणने गायनाला सुरुवात केली. यात विलंबित एकतालातील ‘सरस सूर गावो’ ही बंदीश त्यांनी सादर केली. त्यानंतर ‘देख चंदा नभ निकासी आयो’ ही द्रुत तीन तालांतील बंदीश व मधुरंजनी रागातील मध्यलय झप तालातील ‘येरी सखी आज’ या बंदिशीने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
‘घेई छंद मकरंद’ या नाट्यगीतानंतर त्यांनी संत जनाबार्इंच्या अभंगाने आपल्या गायनाची सांगता केली. त्यांना महेश देसाई (तबला), सारंग कुलकर्णी (हार्मोनियम), योगेश रामदास व अतुल परीट (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
दुसऱ्या सत्रात भारती वैशंपायन यांनी राग बागेश्रीने मैफलीला सुरुवात केली. विलंबित तीन तालांतील ‘बिरहा ना जले’ या बंदिशीनंतर त्यांनी द्रुत तीन तालांतील ‘जारे जारे बिरहा’ ही बंदीश गायली. नायकी कनडा रागातील ‘मेरो पिया’ या बंदिशीनंतर ‘अब के सावन घर आजा’ ही ठुमरी त्यांनी सादर केली. राग भैरवीतील ‘प्रभू अजी कमला’ या रचनेने मैफलीची सांगता केली. त्यांना केदार वैशंपायन (तबला), सारंग कुलकर्णी (हार्मोनियम), मधुरा वैशंपायन (तानपूरा) यांनी साथसंगत केली.
नंदकुमार मराठे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. दीपक भागवत यांनी सूत्रसंचालन केले. रामचंद्र टोपकर यांनी आभार मानले. यावेळी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या को-आॅर्डिनेशन कमिटीचे अध्यक्ष नितीन वाडीकर, डॉ. उदय कुलकर्णी, अॅड. विवेक शुक्ल, गंधार डिग्रजकर, श्रीकांत लिमये, संतोष कोडोलीकर, रामचंद्र पुरोहित, सतीश कुलकर्णी, आदी उपस्थित होते.