लोकसहभागाने श्रमदानातून केला पाणंद रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:32 AM2021-06-16T04:32:37+5:302021-06-16T04:32:37+5:30

गारगोटी : आज कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देश घरी बसून लॉकडाऊन करताना भुदरगड तालुक्यातील नवरसवाडी गावाने सोशल डिस्टन्सिंग पाळत ...

The Panand road was built with the participation of the people | लोकसहभागाने श्रमदानातून केला पाणंद रस्ता

लोकसहभागाने श्रमदानातून केला पाणंद रस्ता

Next

गारगोटी : आज कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देश घरी बसून लॉकडाऊन करताना भुदरगड तालुक्यातील नवरसवाडी गावाने सोशल डिस्टन्सिंग पाळत लोकसहभागातून मुख्य पाणंदसह इतर छोट्या पाणंद असा पाच किमी अंतराचा पाणंद रस्ता श्रमदानातून तयार केला आहे. या पाणंद रस्त्यामुळे गेल्या अनेक वर्षांची गावकऱ्यांची पायपीट संपुष्टात आली आहे.

घरेदारे बंद करून घरात बसून राहण्यापेक्षा गावचा विकास करूया या एकाच ध्येयाने गावकऱ्यांनी एकत्र येऊन गेल्या कित्येक दिवसांत गावकरी मागणी करत असलेला दोन किलोमीटरचा मुख्य पाणंद रस्ता व इतर पोट पाणंद रस्ते असे एकूण पाच किमी अंतराचा रस्ता श्रमदानातून तयार केला.

नवरसवाडी ता भुदरगड या डोंगर कपारीत वसलेल्या छोट्याशा गावाने ही किमया करून समाजमनाला एक आदर्श घालून दिला आहे.एक हजार लोकवस्ती असलेले मिणचे खोरीतील हे गाव ! पूर्वी या गावाला पाण्याचा कोणताच स्रोत उपलब्ध नसल्याने संपूर्ण जिराईत शेती होती. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने शेती निसर्गाधीन !, त्यामुळे या गावातील अनेक तरुण नोकरी धंद्यानिमित्त मुंबई, पुणे, इचलकरंजी,कोल्हापूर अशी शहरे जवळ करायचीत, काम केल्याशिवाय रात्री चूल पेटायची नाही,म्हणून श्रम आणि चिकाटी हे या गावाचे नेहमीच सद्गुण अंगी बाळगलेले. त्यामुळेच गेल्या वीस वर्षांत शिक्षणाला लोकांनी महत्त्व दिले. आज या छोट्याशा गावात अनेक पदवीधर,उद्योजक, सरकारी,खासगी नोकरदार आहेत. काहींनी सरकारी नोकरी व धंद्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. शिक्षणामुळे गावाचा, स्वतःचा, कुटुंबाचा आणि समाज व देशाचा विकास होतो,हे या गावाने कर्तृत्वाने सिद्ध केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून शेतात जाण्यासाठी पाणंद रस्ता होत नव्हता. रस्त्यासाठी भूमी संपादन,रस्त्यासाठी निधी अशा अनेक अडचणी होत्या. पाणंद रस्ता नसल्यामुळे लोकांना पायपीट करावी लागत होती. लोकप्रतिनिधींकडे मागणी होत होती पण अडचणींमुळे रस्ता होत नव्हता. लॉकडाऊनमुळे गावाबाहेर असलेली सर्व गावकरी मंडळी गावाकडे आली आहेत. या मंडळींनी या लॉकडाऊनचा सदुपयोग करण्याचे ठरविले. यात काहींनी पुढाकार घेतला. शेत जमिनीतून परस्पर सामंजस्याने आखणी करण्यात आली. सरकारी मदतीशिवाय लोकसहभाग व श्रमदानातून बघता बघता एक आठवड्यात पाच किमी अंतराचा रस्ता तयार झाला. या रस्त्यामुळे गावाचे आणि शिवाराचे रुप पालटले. त्यामुळे गावात एक प्रकारचा सलोखा निर्माण झाला आहे. या छोट्याशा गावाने इतरांना एक चांगला आदर्शच घालून दिला.

Web Title: The Panand road was built with the participation of the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.