आजरा, भुदरगडमधील पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:25 AM2021-02-11T04:25:36+5:302021-02-11T04:25:36+5:30
कोल्हापूर : ‘महसूल जत्रा’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यात पाणंद रस्ते अतिक्रमण मोहिमेने आता गती पकडली आहे. आजरा आणि भुदरगडमधील १०५ ...
कोल्हापूर : ‘महसूल जत्रा’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यात पाणंद रस्ते अतिक्रमण मोहिमेने आता गती पकडली आहे. आजरा आणि भुदरगडमधील १०५ गावांच्या कामांची सुरुवात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पिंपळगाव (ता. भुदरगड) येथून बुधवारी केली. जेसीबी चालकांना स्वत: सूचना देत तात्काळ कामे सुरू करण्यासही त्यांनी सांगितले. या कामाचा दोन तालुक्यातील ६ हजार ५९ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव येथील कामत पाणंदचे काम स्वत: जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी बोलताना देसाई यांनी ग्रामस्थांनी सामंजस्याने आणि सर्वसंमतीने पाणंद व रस्ते खुले करण्यासाठी तलाठी व मंडल अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा आणि या कामात सहकार्य करावे, असे आवाहन केले.
स्वागत विद्याधर परीट यांनी केले. सरपंच विश्वनाथ कुंभार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी भुदरगड उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसीलदार अश्विनी वरुटे, जिल्हा परिषद सदस्य रोहिणी आबिटकर, सरपंच विश्वनाथ कुंभार, उपसरपंच उदय मिसाळ, पंचायत समिती माजी सभापती स्नेहल परीट, मंडल अधिकारी रामदास लांब, तलाठी दयानंद कांबळे, विलास चव्हाण, सी. एच. चौगुले, अरुण पाटील, माजी सभापती जगदीश पाटील, ग्रामसेवक बोडके, माजी सरपंच बाळासाहेब खतकर, चंद्रकांत शेवाळे, अशोक पाटील, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व कर्मचारी, गावातील सर्व महिला बचत गटाचे पदाधिकारी व सदस्य, सर्व तरुण मंडळांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट ०१
एकाचदिवशी काम सुरु
गाव शिवारातील प्रलंबित आणि जिव्हाळ्याच्या प्रश्नांना सामोपचाराने आणि लोकसहभागाने वाट मोकळी करून देण्यासाठी जिल्हाधिकारी देसाई यांनी जिल्ह्यात महसूल जत्रा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त होण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी एकाचदिवशी भुदरगड तालुक्यातील ५३ गावांतील ६१ हजार ९८० किलोमीटर, तर आजरा तालुक्यामधील ५२ गावांतील ६६ हजार ७०० किलोमीटर लांबीचे रस्ते खुले करण्यास सुरुवात झाली.