पालकमंत्र्यांनी लावले अंधश्रद्धेचे दिवे, पूर नियंत्रणासाठी शोधले उत्तर नवे..!; कोल्हापूरकरांनी घेतला खरपूस समाचार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 03:29 PM2023-08-01T15:29:36+5:302023-08-01T15:30:26+5:30
'प्रार्थनेतून कोल्हापूरचे सगळे प्रश्न मिटले तर तुमचा भव्य नागरी सत्कार करू आणि हत्तीवरून पेढे वाटू'
कोल्हापूर : पालकमंत्री साहेब तुम्ही शिर्डी साईबाबांना केलेल्या प्रार्थनेमुळे पंचगंगेचा पूर गेला असेल तर तुम्हाला विनंती आहे की, कोल्हापूरातील खड्डे, कचरा, पंचगंगेचे प्रदूषण, खंडपीठ, शाहू मिल स्मारक असे सगळे प्रश्न सुटण्यासाठी प्रार्थना करा. प्रार्थनेतून कोल्हापूरचे सगळे प्रश्न मिटले तर तुमचा भव्य नागरी सत्कार करू आणि हत्तीवरून पेढे वाटू अशी तीव्र प्रतिक्रिया कोल्हापूरकरांनी दिली आहे.
एका मंत्र्याने विज्ञानाचा आधार न घेता पुरोगामी शाहूंच्या नगरीबाबत अंधश्रद्धा पसरवत असल्याबद्दल त्यांचा निषेध केला. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मी शिर्डी साईबाबांना प्रार्थना केल्यामुळे कोल्हापूरच्या पंचगंगेला पूर आला नाही असे वक्तव्य केले. याचा कोल्हापूरकरांनी जळजळीत शब्दात समाचार घेतला. हा शाहू विचारांचा आणि प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांचाही अपमान आहे असे मत व्यक्त केले.
कोल्हापूरने यापूर्वी वर्षातून तीनवेळा पूर अनुभवला आहे, कोणत्या पातळीला किती पूर येतो, यानुसार तो नियंत्रणात ठेवण्याचे उपाययोजना केल्या जातात. यामागे शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांना पूर नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांमध्ये इतर आधारांची गरज नाही. शिक्षणमंत्री व पालकमंत्री म्हणून त्यांनी या गोष्टींचा अभ्यास करणे गरजेचे आहे. - उदय गायकवाड (पर्यावरणतज्ज्ञ)
प्रयत्नांपेक्षा प्रार्थनेनेच प्रश्न मिटत असतील तर पालकमंत्र्यांनी हद्दवाढ, खंडपीठ, पंचगंगा प्रदूषण, कचरा उठाव अशा कोल्हापूरच्या सगळ्या प्रश्नांसाठी प्रार्थना करावी. त्यामुळे कोल्हापूर समस्यामुक्त झाले तर कोल्हापूरकर पालकमंत्र्यांचे ऋणी राहतील त्यांनी मांडलेल्या अंधश्रद्धांचा आदर करतील. एवढेच काय त्यांचा भव्य नागरी सत्कार करू आणि हत्तीवरून साखर वाटू. - दिलीप देसाई, सामाजिक कार्यकर्ते
पालकमंत्र्यांच्या बुद्धीला ग्रहण लागले आहे. अंधश्रद्धा आणि कर्मकांडात बुडालेले नेते देशात आणि राज्यात सरकार म्हणून बसल्याने देशाचे वाटोळे होत आहे. मला श्रद्धेचा अनादर करायचा नाही पण एवढे शिकले सवरलेले मंत्रिपदावर काम करणारे नेते आपली बुद्धी गहाण ठेवल्यासारखे वागताना पाहून खेद होतो. ही पुरोगामी शाहूंच्या विचारांची अवहेलना आहे. - भारती पवार, माजी नगरसेविका
शिक्षणाने बोलघेवडा राजकारणी निर्माण केला आहे. हे विज्ञानाची सृष्टी उपभोगतात पण ती दृष्टी नाही. दैववाद, कर्मकांड आणि अंधश्रद्धा पसरवण्यात नेतेच पुढे असतात म्हणून लोकही तसेच वागतात. संसदेत पूजा काय घालतात, विमानाला लिंबूमिरची बांधतात, अधिवेशनही मुहूर्त बघून सुरू करतात, खोटं बोलतात आणि आपली राजकीय पोळी भाजून घेतात. - सीमा पाटील, अंधश्रद्धा निर्मूलन समिती
पूर येऊ नये म्हणून प्रशासनाने, पाटबंधारे, आपत्ती व्यवस्थापन अशा अनेक विभागांनी कित्येक दिवस अभ्यास करून उपाययोजना केल्या. केवळ प्रार्थनेने पूर गेला म्हणणे म्हणजे आपल्याच प्रशासनावर अविश्वास व्यक्त करण्याचा प्रकार आहे. शेवटी हे निसर्गाचे चक्र आहे आपण पेरू तेच परत मिळणार. - गीता हासूरकर, सामाजिक कार्यकर्त्या
आम्ही २००५ साली आलेल्या पुरापासून काम करत आहोत, अजून जिल्ह्यातील धरणं भरलेली नाहीत, कोयनेतून विसर्ग नाही पंचगंगा धोका पातळीवर गेली नाही त्याआधीच पुराची धास्ती घेतली गेली. पुढे जाऊन अतिवृष्टी झाली, धरणांतून पाणी सोडल्यावर काय करणार? - अशोक रोकडे, व्हाईट आर्मी
शाहू महाराजांनी विज्ञानाची कास धरत राधानगरी धरणाद्वारे रयतेचे कोटकल्याण केले. मंत्री दीपक केसरकर यांनी विज्ञानाच्या अभ्यासात काय दिवे लावले असतील हे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येते. त्रिकूट सरकार राज्यातील शिक्षणाचा खेळखंडोबा करत नव्या पिढीला अज्ञानाच्या अंधकारात ढकलायची तयारी करत आहे. जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांची कायमची रवानगी शिर्डीला करावी. या मागणीसाठी ते कोल्हापूरला येतील तेव्हा त्यांचे काळे झेंड्यांनी स्वागत केले जाईल. - डॉ. उदय नारकर, राज्य सचिव, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष