पंचगंगेने ‘इशारा पातळी’ ओलांडली

By Admin | Published: July 26, 2014 12:07 AM2014-07-26T00:07:43+5:302014-07-26T00:36:37+5:30

पावसाची उसंत : नदीकाठच्या गावांना ‘सतर्कतेचा इशारा’; ६९ बंधारे पाण्याखालीच

Panchaganga has exceeded the 'gesture level' | पंचगंगेने ‘इशारा पातळी’ ओलांडली

पंचगंगेने ‘इशारा पातळी’ ओलांडली

googlenewsNext

कोल्हापूर : पावसाने आज, शुक्रवारी दिवसभर उसंत घेतली असली तरी नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. पंचगंगेने ‘इशारा पातळी’ ओलांडली असून सायंकाळी सहा वाजता पंचगंगेचे पाणी ३९.२ फुटांवर राहिल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने ‘सतर्कतेचा इशारा’ दिला आहे. जिल्ह्यातील ६९ बंधारे अद्यापही पाण्याखाली असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
सकाळपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी होते. गेली चार दिवस जिल्ह्यात धुवाधार पाऊस राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाची तीव्रता इतकी प्रचंड होती की दिवसाही नागरिकांना घरातून बाहेर पडणे मुश्कील केले होते. त्याचा परिणाम बाजारपेठेवर दिसत आहे. बाजारपेठा ओस पडला आहेतच, पण त्याबरोबर शेतीकामात बळिराजा मग्न असल्याने संपूर्ण उलाढाल ठप्प झाल्यासारखी आहे. दोन दिवसांच्या तुलनेत आज पावसाने थोडी उसंत घेतली आहे. सकाळपासून पूर्णपणे उघडीप राहिली, दुपारनंतर अधून-मधून जोरदार सरी कोसळल्या.
शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ३५.०४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गगनबावड्यासह आजरा तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. पंचगंगा नदीची पातळी ३९.२ फुटांवर पोहोचली आहे. ३९ फुटांची इशारा पातळी पंचगंगेने ओलांडल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आठ मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद असून दहा मार्ग अंशत: बंद आहे. ३९ मार्गांवरील एस. टी. वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
धरणक्षेत्रातही पाऊस चांगला सुरू आहे. राधानगरी धरण ८१ टक्के व वारणा ७६ टक्के भरले आहे. राधानगरीतून प्रतिसेकंद ६०० व वारणातून ९५० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कासारी, कडवी, जांबरे, कोदे, घटप्रभा धरणांतूनही पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांची पातळी स्थिर राहिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Panchaganga has exceeded the 'gesture level'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.