पंचगंगा काठी सेल्फीसाठी अतिउत्साहींचा ‘पूर’
By admin | Published: July 14, 2016 12:38 AM2016-07-14T00:38:24+5:302016-07-14T00:38:24+5:30
पोलिसांची डोकेदुखी : पूर पाहण्यासाठी शिवाजी पूल परिसरात भरली जत्रा; खबरदारीसाठी सौम्य लाठीमार
कोल्हापूर : पंचगंगा नदीसह कोल्हापूर-आंबेवाडी रस्त्यावरील पुराचे पाणी पाहण्यासाठी येणाऱ्या अनेक अतिउत्साही नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची डोकेदुखी बुधवारी वाढविली. पूर पाहण्यासाठी आलेल्या आबालवृद्धांमुळे दिवसभर शिवाजी पूल परिसरात जत्रा भरल्याचे चित्र होते. अनेकजण धोकादायक ‘सेल्फी’ काढण्यासाठी धडपडत होते.
पावसाचा जोर कायम राहिल्याने कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर बुधवारी सकाळपासून पुराचे पाणी आले. शिवाय पंचगंगा नदीची पाणीपातळीही वाढली. त्यामुळे पूरस्थिती पाहण्यासाठी सकाळी दहा वाजल्यापासून नागरिक शिवाजी पूल परिसरात येऊ लागले. ब्रह्मपुरी आणि शाहूकालीन हौदाजवळील पुरातन मंदिर परिसरात नागरिकांनी पूर पाहण्यासाठी गर्दी केली. त्यातच बाराच्या सुमारास रेडेडोहजवळून तीन मुले वाहून गेल्याचे समजताच आंबेवाडीकडे जाण्यासाठी युवक, नागरिकांची गर्दी वाढली. सुरक्षिततेच्या कारणावरून पोलिसांनी शिवाजी पुलाच्या चौकात लोखंडी अडथळे उभारून वाहतूक रोखली होती. या पुलावरून पुढे सोडण्यात येत नव्हते. पूर पाहण्यासह रेडेडोहाकडे जाण्यास इच्छुक असलेल्या नागरिकांची गर्दी तासागणिक वाढू लागली. यातील काही
अतिउत्साही नागरिकांची शिवाजी पुलावरून पुढे जाण्यासाठी धडपड
सुरू होती. काहीजणांची येथूनच ‘सेल्फी’ टिपण्याची घाई सुरू होती. यातील काही अतिउत्साहींना पोलिसांनी सौम्य स्वरूपात लाठीचा प्रसादही दिला.
सायंकाळी उशिरापर्यंत या ठिकाणी नागरिकांची गर्दी कायम होती. या परिसरात शहरातील विविध भागांतून दुचाकी, चारचाकी वाहनांसह आबालवृद्ध येऊ लागले. या ठिकाणी होणाऱ्या गर्दीत व्यवसायाची संधी साधण्यासाठी गरम स्वीटकॉर्न, पेरू, आदी स्वरूपातील खाद्यपदार्थांची विक्री अनेक विक्रेत्यांकडून सुरू होती. पावसाच्या थंड हवेत गरमागरम स्वीटकॉर्नवर ताव मारत अनेकजण सहकुटूंब पुराचे दृश्य पाहत होते. (प्रतिनिधी)
आम्ही आंबेवाडी, चिखलीचे आहोत
४पाण्याची पातळी वाढत असल्याने सुरक्षिततेच्या कारणामुळे पोलिस आंबेवाडीच्या दिशेने लोकांना सोडत नव्हते; पण काही युवक, नागरिक ‘आम्ही आंबेवाडी, चिखली, वडणगेचे ग्रामस्थ आहोत,’ असे सांगून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत होते.
४यातील काहीजणांनी पोलिसांशी हुज्जतही घातली. यातूनही जे पुढे गेले ते रस्त्यावरील पाणी पाहून मागे फिरत होते.
पुराचे पाणी आलेल्या आंबेवाडी आणि बालिंगा पूल येथील रस्त्यांवरून काही युवक, नागरिक चालत ये-जा करीत होते. यांतील काही अतिउत्साही युवक परिस्थितीचे गांभीर्य समजून न घेता रस्त्यावरून वाहत्या पाण्यातच धोकादायकरीत्या ‘सेल्फी’ घेत होते.