पंचगंगा पुुुनरुज्जीवनाचा ४८५ कोटींचा आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 01:43 AM2020-01-29T01:43:17+5:302020-01-29T01:44:33+5:30
विश्वास पाटील । कोल्हापूर : करवीर, कागल, राधानगरी आणि हातकणंगले तालुक्यांतील ६४ गावांत सांडपाणी प्रक्रिया केंद्रे व नदीकाठी दोन ...
विश्वास पाटील ।
कोल्हापूर : करवीर, कागल, राधानगरी आणि हातकणंगले तालुक्यांतील ६४ गावांत सांडपाणी प्रक्रिया केंद्रे व नदीकाठी दोन किलोमीटर अंतरात जमिनीची धूप थोपविण्यासाठी बांबू लागवडीचा कार्यक्रम सुचविणारा तब्बल ४८५ कोटी रुपयांचा पंचगंगा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प आराखडा सामाजिक वनीकरण विभागाने तयार केला आहे. पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आतापर्यंत अनेक आराखडे झाले; त्यातील काहींची अंमलबजावणी सुरू आहे. तोपर्यंत हा नवीनच आराखडा तयार करण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या बंगलोरच्या इन्स्टिट्यूट आॅफ वूड सायन्स अॅँड टेक्नॉलॉजी (आयडब्लूएसटी) या संस्थेने मूळ वनीकरण हस्तक्षेपातून कृष्णा नदीचे पुनरुज्जीवन करण्यासंदर्भात कोल्हापूरसह सांगली, सातारा व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना कृष्णेच्या उपनद्या असलेल्या नद्यांच्या प्रदूषणासंदर्भात असे आराखडे तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पंचगंगा नदीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. चार जिल्ह्यांतून वनविभागाच्या क्षेत्रातील कामे व ती वगळून अन्य कामे असे स्वतंत्र आराखडे मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने मागविले आहेत. त्यांच्या कार्यालयाकडून हे सर्व आराखडे एकत्रित करून ते बंगलोरच्या संस्थेकडे पाठविले जाणार आहेत. सामाजिक वनीकरण विभागाने गुगल मॅपिंगच्या साहाय्याने जी गावे निश्चित केलेल्या अंतरामध्ये समाविष्ट होतात, त्या गावांमध्ये ही कामे सुचविण्यात आली आहेत. कागल तालुक्यातील वंदूर गावात सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुचविण्यात आले आहे. त्यासाठी ९१ लाख अपेक्षित खर्च धरण्यात आला आहे. वाळवे खुर्द ते सुळकूडपर्यंत नदीकाठी बांबू लागवडीसाठी ३२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
नदीकाठच्या गावांना सांडपाणी प्रक्रिया केंद्रे करणे शक्य होत नाही. केंद्र सरकारच्या निधीतून ती होत असतील तर व्हावीत, या हेतूने सरसकट अशी केंद्रे सुचविण्यात आली आहेत; परंतु ग्रामीण भागांत प्रक्रिया करण्याएवढे सांडपाणीच नदीत मिसळत नसल्याचे यापूर्वीच्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
नेमके काय करणार?
कृष्णा नदीच्या पात्रापासून पाच किलोमीटरच्या कक्षेत येणारी गावे व तिच्या उपनद्यांच्या पात्रापासून दोन कि.मी.च्या गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारणे व नदीपासून दोन कि मीच्या अंतरात नदीकाठी व रस्त्याच्या कडेला बांबूच्या लागवडीचा कार्यक्रम हाती घेणे. सांडपाणी रोखल्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत आणि बांबंूमुळे नदी व जमिनीची धूप कमी होईल.
- असा आहे आराखडा
तालुका काम रक्कम
करवीर २७ ३७२ कोटी ८८ लाख
हातकणंगले १६ १६ कोटी २७ लाख
राधानगरी १७ ६१ कोटी ४० लाख
कागल २७ ३५ कोटी ५१ लाख
- ८७ कामे ४८५ कोटी १८ लाख
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कृष्णा नदीच्या प्रदूषण नियंत्रणाचा अभ्यास अहवाल तयार आहे. पंचगंगा प्रदूषणाबाबतही हायकोर्टच्या आदेशानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत कामे सुरू आहेत. असे असताना प्रदूषणाची कोणतीच तांत्रिक माहिती अवगत नसलेला हा आराखडा करून मागितला जावा, हेच खरे आश्चर्य आहे.
- उदय गायकवाड, प्रदूषण नियंत्रण समिती