पंचगंगा प्रदूषणमुक्ती आपल्याच हातात ! मधुकर बाचूळकर : ‘चला पंचगंगा जपूया’ या विषयावर शिक्षकांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 12:47 AM2018-09-11T00:47:44+5:302018-09-11T00:48:56+5:30
पंचगंगा प्रदूषणमुक्ती हा काय माझ्या एकट्याचा प्रश्न नाही. प्रदूषणमुक्ती करायची असेल, तर ती समाज आणि नागरिकच करू शकतात; त्यासाठी आपण प्रबोधन केले पाहिजे, असे मत वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर यांनी
कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणमुक्ती हा काय माझ्या एकट्याचा प्रश्न नाही. प्रदूषणमुक्ती करायची असेल, तर ती समाज आणि नागरिकच करू शकतात; त्यासाठी आपण प्रबोधन केले पाहिजे, असे मत वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर यांनी कोल्हापुरात सोमवारी व्यक्त केले.
ते गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण विभाग, रोटरी क्लब आॅफ करवीर व रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित ‘चला पंचगंगा जपूया’ या विषयावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शाहू स्मारक भवनात ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक अध्यक्षस्थानी होत्या. बाचूळकर यांनी शिक्षकांना पंचगंगा प्रदूषणाविषयी जनजागृतीचे आवाहन यावेळी केले.
बाचूळकर म्हणाले, पंचगंगा ही गटारगंगा बनली आहे. मैलामिश्रित सांडपाणी, विविध नाल्यांमधून येणारे दुर्गंधीयुक्त पाणी तसेच प्लास्टिक, थर्माकोल ही प्रदूषणाची कारणे आहेत. याचबरोबर रंकाळा तलावात मिसळणाऱ्या मैलामिश्रित पाण्यामुळे रंकाळासुद्धा प्रदूषित झाला आहे. प्रत्येक शिक्षकाने प्रामुख्याने नदीकाठावरील लोकांमध्ये पंचगंगा प्रदूषणाविषयी जनजागृती करावी.
प्रदूषणामुळे कोणते दुष्परिणाम होतात, याविषयी सूचना करून प्रबोधन करावे; पण पर्यावरणावर काम करणाºया विविध स्वयंसेवी संघटना आणि याप्रश्नी प्रसारमाध्यमांतून झालेल्या लिखाणामुळे गणेश मूर्तिदानचे प्रमाण वाढले आहे, हा आपला विजय आहे.
दुसरीकडे, गणेशोत्सव काळात साउंड सिस्टीमचा वापर करू नका, त्याऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करा. फटाक्यांचा वापर कमी करा, फटाक्यांमुळे ध्वनी व जलप्रदूषण होते, ते टाळावे.शौमिका महाडिक म्हणाल्या, पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी समाजातील सर्वच घटकांनी सहभाग घेतला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी राजकारणविरहित एकत्र येऊन काम केले पाहिजे.
पंचगंगा ही माझी आई आहे, असे समजून काम केले, तर प्रदूषणमुक्ती होण्यास फार वेळ लागणार नाही; त्यामुळे आपल्या आईला वाचविण्यासाठी सर्वांनी पुढे यायला पाहिजे. यावेळी रोटरी क्लब आॅफ करवीरचे अध्यक्ष मनोज कोळेकर यांनी प्रास्ताविक, तर रोटरी चॅरिटेबलचे सचिव एस. एन. पाटील यांनी स्वागत केले. यावेळी उपशिक्षण अधिकारी जे. एस. जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रोटरीचे सचिव संजय पाटील, रोटरी चॅरिटेबल करवीरचे अध्यक्ष दिनकर आदिक उपस्थित होते.
हे करा...
निर्माल्य नदी / तलावात टाकू नका.
गणेशमूर्ती दान करा अथवा घरामध्ये बादलीत मूर्ती विसर्जित करा.
कोणीही प्लास्टिक पिशवीतून निर्माल्य आणू नका, कापडी पिशवीतून आणा.
प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी शाडू मूर्तीचा वापर करा. प्लॅस्टर आॅफ पॅरिस जलचरांना मारक.
घरगुती, मंडळाच्या गणेशमूर्ती कुंडीत विसर्जित करा.
गणेशमूर्ती काहिलीमध्ये विसर्जित करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करा.
नदीकाठावरील नागरिकांमध्ये प्रदूषणविषयी जनजागृती करा.
हे घटक प्रदूषणासाठी कारणीभूत...
प्लास्टिक, थर्माकोल आणि सांडपाणी, मैलामिश्रित
निर्माल्य
गणेशमूर्तींचे रंग रासायनिक असतात. ते घातक आहेत; त्यामुळे मूर्ती दान करा.