‘पंचगंगा’ प्रदूषणप्रश्नी अधिकारी धारेवर
By admin | Published: February 3, 2015 12:10 AM2015-02-03T00:10:50+5:302015-02-03T00:29:13+5:30
तेरवाड बंधाऱ्याची पाहणी : कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याची मागणी
कुरुंदवाड : इचलकरंजीतील औद्योगिकरणाचे रसायनयुक्त सांडपाणी थेट पंचगंगा नदीत सोडल्याने हे पाणी काळेकुट्ट बनले आहे. यामुळे शिरोळ तालुक्यातील पंचगंगा काठच्या नागरिकांचे आरोग्य पुन्हा धोक्यात आल्याने तीव्र संताप व्यक्तहोत आहे. संतप्त नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रारी नोंदविल्याने या विभागाचे क्षेत्र अधिकारी राजेश आवटी यांनी तेरवाड बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला. मात्र, केवळ वारंवार पंचनामाच केला जात असून, कारवाईच होत नसल्याने नागरिकांनी आवटी यांना धारेवर धरले व या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली.पंचगंगा नदी प्रदूषणाचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्यातील गावांना बसत आहे. प्रदूषित पाण्यामुळे ही नदी येथील नागरिकांसाठी संकट बनली आहे. नदी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई व्हावी यासाठी शिरोळ तालुक्यातील अनेक सामाजिक संघटना आंदोलन करून थकले. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पाटबंधारे विभागाच्या नाकर्तेपणामुळे प्रदूषण करणारे बिनधास्तच राहिले याचा परिणाम शिरोळ तालुक्यातील नागरिकांना भोगावे लागत आहेत.नदी प्रदूषणामुळे तेरवाड बंधाऱ्यावर मासे मृत झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र आंदोलन करीत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना पाणी, जलपर्णी व मृत मासे वाहून जाण्यासाठी तेरवाड बंधाऱ्याचे बरगे काढण्याचा निर्णय झाला होता. पाणी वाहून गेल्याने प्रदूषणाची तीव्रता कमी झाली होती. मात्र, पुन्हा इचलकरंजी शहरातून प्रोसेसचे रसायनयुक्त सांडपाणी ओढ्यावाटे नदीत सोडल्याने नदीला काळेकुट्ट पाणी आले असून, उग्र वास येत आहे. तसेच पाण्याला फेस येत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी राजेश आवटी बंधाऱ्यावर आले. अधिकारी आल्याचे समजताच स्वाभिमानी युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष बंडू पाटील, विश्वास बालिघाटे, कल्लाप्पा बेडक्याळे, मलगोंडा पाटील, रोहित कारदगे, वैभव पाटील, दादा पाटील, नीलेश बरगाले आदींनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करीत धारेवर धरले. अधिकारी आवटी यांनी नदीतील पाणी घेऊन तपासणीसाठी पंचनामा केला.