‘पंचगंगा’ प्रदूषण शिरोळच्या मुळावर
By admin | Published: November 17, 2015 12:22 AM2015-11-17T00:22:14+5:302015-11-17T00:25:23+5:30
नागरिकांच्या आरोग्याबरोबरच शेतीही बिघडली
संदीप बावचे --जयसिंगपूर -‘नेमीचे येतो पावसाळा’ याप्रमाणे प्रत्येक निवडणुकामध्ये पक्षाच्या उमेदवारांच्या जाहीरनाम्यात प्रत्येकवेळी पंचगंगा प्रदूषण मार्गी लावण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र, हे आश्वासनच राहिले आहे. अनेक वर्षांपासून नदी क्षेत्रात वाढलेले औद्योगिकरण, शहरातील सांडपाणी यामुळे पंचगंगेच्या काळ्या पाण्याची शिक्षा शिरोळकरांना भोगावी लागत आहे.
पंचगंगा नदीमुळे तालुक्यातील शिरदवाड, अब्दुललाट, हेरवाड, तेरवाड, धरणगुत्ती, आगर, कुरूंदवाड, शिरोळसह सुमारे २३ गावे ओलिताखाली आली. त्यामुळे शेती सुजलाम-सुफलाम् बनली. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटला. मात्र, बारमाही वाहणाऱ्या या नदीमुळे काठावरील गावात औद्योगिक क्षेत्र वाढले अन् कोल्हापूरपासून इचलकरंजीपर्यंत औद्योगिकरणाचे, शहरातील सांडपाणी थेट नदीपात्रात सोडल्याने नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत गेला. शिवाय रसायनयुक्त पाण्यामुळे जलचर प्राणी नाश पावत असल्याने प्रदूषणाची समस्या अधिकच गंभीर बनली आहे. वाहून येणारे प्रदूषित पाणी शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीवरील शिरोळ व तेरवाड या शेवटच्या बंधाऱ्यावर येऊन तटत असल्याने याचा फटका गेली अनेक वर्षे तालुक्यालाच जास्त बसत आहे. प्रदूषित पाण्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेच. शिवाय रसायनयुक्त पाण्यामुळे पिकाऊ जमीन नापीक बनत आहे.
दरवर्षी आॅक्टोबरनंतर दूषित पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. यासाठी शासन पातळीवर अनेक वेळा आंदोलन करून लक्ष वेधण्यात आले. नदी प्रदूषित करणाऱ्या घटकावर केवळ जुजबी कारवाई करण्यापलीकडे आतापर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. यावर ठोस कारवाई करण्याची गरज आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळावरच कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.
ऐन दिवाळीमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुटीचा फायदा घेत इचलकरंजी शहरातील सांडपाणी व औद्योगिक कारखान्याचे रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदी पात्रात सोडल्याने पंचगंगा नदी पात्रातील पाणी पूर्णपणे दूषित बनले आहे. नदीला काळेकुट्ट पाणी आले. पाण्याला उग्र वास सध्या येत असून नदीपात्रात अक्षरश: मृत माशांचा थर पडला होता. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त झाला. (पुर्वार्ध)