पंचगंगेचे ‘दुखणं’ बळावतंय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 11:43 PM2018-11-18T23:43:52+5:302018-11-18T23:43:57+5:30
कोल्हापूर :शहरातील साठ टक्के भागातच भूमिगत मैला-सांडपाणी वाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. त्यांवर प्रक्रिया होते; मात्र शहराच्या उर्वरित चाळीस टक्के ...
कोल्हापूर :शहरातील साठ टक्के भागातच भूमिगत मैला-सांडपाणी वाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. त्यांवर प्रक्रिया होते; मात्र शहराच्या उर्वरित चाळीस टक्के भागात अद्याप भूमिगत मैला सांडपाणी वाहिन्या टाकण्यात आलेल्या नाहीत. परिणामी रस्त्याकडेच्या गटारीतून, विविध नाल्यांतून हे मैलामिश्रित सांडपाणी शेवटी नदीत मिसळते. त्यामुळे प्रदूषणाची तीव्रता वाढलेली आहे. त्याचा परिणाम कोल्हापूरच्या शहरवासीयांना भोगावा लागत नसला तरी नदीच्या खालच्या बाजूंकडील नागरिक मात्र त्रस्त आहेत.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
पंचगंगा नदीचे प्रदूषण ही एक चिंतेची बाब बनली आहे. अनेक ठिकाणांहून थेट पंचगंगा नदीत मैला व रसायनमिश्रित सांडपाणी मिसळत असल्याने नदीकाठावरील गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिरोळ तालुक्यात तर कर्करोगाचे रुग्ण आढळून येत आहेत, इतकी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणण्यात कोल्हापूर महानगरपालिकेचा वाटा मोठा आहे. नदी प्रदूषणप्रकरणी पालिकेला शेकडो शो कॉज नोटीस बजावल्या, गुन्हे दाखल झाले, उच्च न्यायालयाने फटकारले, राष्टÑीय हरित लवादाने दंड ठोठावण्याचा इशारा दिला. तरीही प्रदूषण रोखण्यात पालिकेला यश आलेले नाही.
सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे जयंती व दुधाळी नाल्यांवर सांडपाणी उपसा यंत्रणा कार्यान्वित केली आहे. तरीही अनेकवेळा हे नाले ओसंडून वाहून थेट नदीत मिसळतात.
त्याला तांत्रिक कारणे पुढे केली जातात. लाईन बझार येथे
७६ कोटी रुपये खर्च करून अद्ययावत सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) उभारण्यात आले असले, तरी त्याकडे ७५ एमएलडी सांडपाणी दिले जात नाही. जेमतेम ५० ते ५५ एमएलडी सांडपाणी तेथे पोहोचते. बाकी २० ते २५ एमएलडी सांडपाणी नदीत मिसळते.
शहरात लक्षतीर्थ, फुलेवाडी, जामदार क्लब, पिकनिक पॉइंट, जुना बुधवार, रमणमळा, शुगर मिल, छत्रपती कॉलनी, बापट कॅम्प, राजहंस प्रेसनजीक, सीपीआर असे १२ छोटे मोठे नाले असून ते अडविणे आणि एस.टी.पी.कडे वळविणे यासाठी राज्य सरकारने निधी दिला आहे; परंतु ही कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे प्रदूषणाची पातळी वाढते आहे. यातून प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येतो.