पंचगंगेने गाठली इशारा पातळी

By admin | Published: August 5, 2016 01:26 AM2016-08-05T01:26:59+5:302016-08-05T01:59:47+5:30

‘राधानगरी’चे चार दरवाजे बंद : एकातून ३ हजार ६२८ क्युसेक्स विसर्ग सुरू

Panchaganga's warning level reached | पंचगंगेने गाठली इशारा पातळी

पंचगंगेने गाठली इशारा पातळी

Next

कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला संततधार पावसाचा जोर गुरुवारी ओसरला तरी राधानगरीसह कासारी व कुंभी धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे पंचगंगा नदीने रात्री ‘इशारा पातळी’ गाठली. बुधवारी सुरू असलेले राधानगरी धरणाचे पाचपैकी चार दरवाजे गुरुवारी बंद झाल्याने ५ क्रमांकाच्या दरवाजातून ३ हजार ६२८ क्युसेक्स विसर्ग सुरू राहिला. सायंकाळी राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ३८.६ फुटांवर गेली. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात एकूण ५९४.३७ मि.मी. पावसाची नोंद झाली असून यामध्ये चंदगडमध्ये सर्वाधिक ८७.८३ मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यातील ५२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
जिल्ह्यात पावसाने गेल्या चार दिवसांपासून संततधार सुरू ठेवली आहे. गुरुवारी पावसाचा जोर थोडा ओसरला. शहरात काही काळ सूर्यनारायणाचे दर्शनही झाले; परंतु दिवसभरात पावसाच्या मोठ्या सरींमुळे सर्वत्र पाणी-पाणी होऊन ते सखल भागात साचून राहिले. बुुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडून त्यातून ९००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला; परंतु गुरुवारी पावसाने उसंत घेतल्याने यापैकी चार दरवाजे बंद करण्यात येऊन क्रमांक ५ च्या दरवाज्यातून ३ हजार ६२८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला. पावसाचा जोर कमी असला तरी राधानगरीसह कुंभी-कासारी धरणांतून मोठ्या प्रमाणात झालेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊन रात्री ‘इशारा पातळी’ गाठली. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पंचगंगा नदीवरील ७, भोगावतीवरील ५, तुळशीवरील १, वारणेवरील ७, कासारीवरील ८, कुंभीवरील ४, कडवीवरील ४, वेदगंगेवरील ६, हिरण्यकेशीवरील ४, ताम्रपर्णीवरील २, दुधगंगेवरील १, धामणीवरील २, जांबरेवरील १ असे ५२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील ७ राज्यमार्ग, ९ जिल्हा मार्ग, १० इतर जिल्हा मार्ग, ९ ग्रामीण मार्ग खंडित झाले असून या मार्गावरील वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. इतर सर्व मार्गांवरील एस. टी. वाहतूक सुरळीत आहे.
गुरुवारी सकाळी आठपर्यंत संपलेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय पाऊस मि.मी.मध्ये असा- हातकणंगले-१३.२५, शिरोळ-१३.७१, पन्हाळा-६८.७१, शाहूवाडी-५७, राधानगरी-६९.५०, गगनबावडा-६९, करवीर-३५.९०, कागल-४०.६०, गडहिंग्लज-३०, भुदरगड-४३.०८, आजरा-६९.२५, चंदगड-८७.८३.


पाणी जामदार क्लबपर्यंत
कोल्हापूर : गेले तीन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडून गुरुवारी दुपारी जामदार क्लबजवळ आले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली; तर बाबूभाई परीख पूल, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील चौक, आदी सखल भागांत पाणी साचून राहिले. -वृत्त/हॅलो १
कृष्णा, पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ
जयसिंगपूर : धरणक्षेत्रात कोसळत असलेला धुवाधार पाऊस व तालुक्यात झालेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत कृष्णेच्या पाणीपातळीत दहा फुटाने, तर पंचगंगेच्या पाणीपातळीत सात फुटाने वाढ झाली आहे. आलमट्टी धरणात येणारे पाणी आणि होणारा विसर्ग याकडे जिल्हा प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे. -वृत्त/४

Web Title: Panchaganga's warning level reached

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.