चंदूर ग्रामस्थांना पंचगंगेचे दूषित पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2017 10:13 PM2017-04-02T22:13:13+5:302017-04-02T22:13:13+5:30
ग्रामस्थांचे आरोग्य धाब्यावर : भारत निर्माण पाणीपुरवठा योजना अर्धवट अवस्थेत
अतुल आंबी -- इचलकरंजी --चंदूर (ता. हातकणंगले) येथील भारत निर्माण पाणीपुरवठा योजना अर्धवट अवस्थेत सुरू आहे. प्रकल्प मंजूर होऊन दहा वर्षे उलटली तरी गावभागातील ग्रामस्थांना आजतागायत पंचगंगा नदीतील प्रदूषित पाणी विनाप्रक्रिया थेट प्यावे लागत आहे. राजकीय वाद-विवाद व शासनाकडून मिळणाऱ्या निधीची उदासीनता अशा गोंधळात हा प्रकल्प रखडला आहे. विशेष म्हणजे अशुद्ध पाणी पिऊनही ग्रामस्थांना पाणीपट्टी मात्र शुद्ध पाण्याची भरावी लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत असून, पेयजल प्रकल्प तत्काळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावा, अशी मागणी होत आहे.
पंचगंगा नदीकाठावर असलेल्या चंदूर गावाला गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेमार्फत नदीतील पाणी कोणतीही प्रक्रिया न करता नळाद्वारे थेट पुरविले जाते. पंचगंगा नदीचे दिवसेंदिवस वाढत जाणारे प्रदूषण यामुळे सन २००४ ला केंद्र शासनाकडून गावासाठी तीन कोटी ४६ लाखांची भारत निर्माण पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. मात्र, कागदपत्रांची पूर्तता व निधी उपलब्ध होण्यात चार वर्षे निघून गेली. त्यानंतर सन २००८ ला प्रत्यक्षात काम सुरू झाले. ते आजतागायत पूर्ण झालेच नाही. पहिल्या टप्प्यात गावच्या वाढीव भागात म्हणजेच शाहूनगर, साईनगर, आभार फाटा, माळभाग या परिसरात प्रक्रिया केलेला शुद्ध पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.
त्यानंतर गावभागात बिरोबा मंदिरपर्यंत शुद्ध पाणी येण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी गेला. त्यानंतर पुन्हा दोन वर्षांनी ग्रामपंचायत परिसरापर्यंत हा शुद्ध पाणीपुरवठा पोहोचला.
त्यानंतरही काही वर्षे उलटली तरी आजतागायत संपूर्ण गावाला शुद्ध पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे ग्रामस्थांना आजही पंचगंगा नदीतून येणारे मैलामिश्रित व अशुद्ध पाणीच थेट प्यावे लागत आहे. ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी कायद्यात तरतूद असतानाही तो कायदा डावलून चंदूर ग्रामपंचायत गावभागातील ग्रामस्थांना आजही अशुद्ध पाणीपुरवठा करीत आहे. एखाद्या सुजान ग्रामस्थाने याविरोधात न्यायालयात धाव घेतल्यास प्रशासनाची चांगलीच पाचावर धारण बसेल, असेही जाणकारांकडून सांगण्यात आले.
एकीकडे अशुद्ध पाणीपुरवठा सुरू असतानाही त्या ग्रामस्थांकडून शुद्ध पाणीपुरवठा नियमानुसार होणारी पाणीपट्टी वसूल केली जात आहे. ग्रामस्थांवर होणारा हा अन्याय ग्रामपंचायतीने तत्काळ बंद करून शुद्ध पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी होत आहे.
शासनाकडून निधी मिळण्यास विलंब
योजना सन २००४ साली मंजूर झाली असली तरी सन २०१६ साल उगवले तरी अद्याप शासनाकडून जवळपास सव्वा कोटी रुपये निधी येणे बाकी आहे.
योजनेचे काम सुरू झाल्यानंतरही अनेकवेळा निधी मिळण्यास विलंब झाला. त्यावेळी संबंधित मक्तेदाराने स्वखर्चाने काम सुरू ठेवले होते. मात्र, वारंवारच्या विलंबामुळे काम संथगतीने झाले.
शुद्ध पेयजल प्रकल्पही बंद
चंदूर येथील ग्रामस्थांचा अशुद्ध पाण्यापासून बचाव होण्यासाठी नवमहाराष्ट्र सूतगिरणीच्यावतीने एक रुपयात दहा लिटर शुद्ध पाणी मिळणारा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. अनेक ग्रामस्थ तेथून पाणी नेऊन पित होते. मात्र, गेल्या वर्षभरापासून तोही बंद पडला आहे. ग्रामपंचायतीने याकडेही दुर्लक्ष केले आहे.