महापालिका हद्दीत १० हजारांवर पंचनामे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 11:46 AM2019-08-31T11:46:17+5:302019-08-31T11:51:43+5:30
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराचा महापालिका हद्दीतील नागरिकांना तसेच उद्योजक, व्यावसायिकांना मोठा फटका बसला असून, त्याच्या मूल्यांकनाचे काम सुरू झाले आहे. महसूल विभागातर्फे १० हजार १६० पूरग्रस्तांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यापैकी ९२१४ पूरग्रस्तांना आतापर्यंत चार कोटी ६० लाख ७० हजार रुपयांचे अनुदान वाटप झाले असून, उर्वरित पूरग्रस्तांना अनुदान देण्याची प्रक्रिया सुरूच आहे.
कोल्हापूर : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराचा महापालिका हद्दीतील नागरिकांना तसेच उद्योजक, व्यावसायिकांना मोठा फटका बसला असून, त्याच्या मूल्यांकनाचे काम सुरू झाले आहे. महसूल विभागातर्फे १० हजार १६० पूरग्रस्तांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यापैकी ९२१४ पूरग्रस्तांना आतापर्यंत चार कोटी ६० लाख ७० हजार रुपयांचे अनुदान वाटप झाले असून, उर्वरित पूरग्रस्तांना अनुदान देण्याची प्रक्रिया सुरूच आहे.
कोल्हापूर शहराचे कधी नव्हे इतके मोठे नुकसान अतिवृष्टी व महापुरामुळे झाले आहे. अनेक कुटुंबांनी या नुकसानीतून सावरण्याचा प्रयत्न सुरू केला असला, तरी शेकडो उद्योजक व व्यावसायिक या नुकसानीतून पुन्हा उभे राहणे अवघड आहे. शहर हद्दीत झालेल्या नुकसानीबाबतचे पंचनामे करण्याचे काम पुणे महानगरपालिका उपायुक्त संतोष भोर यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यांनी महापालिका, महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन जलदगतीने आतापर्यंत १० हजार १६० पंचनामे पूर्ण केले आहेत.
अद्याप काही नागरिक घरात पोहोचले नसल्याने पंचनामे पूर्ण व्हायचे आहेत. ९२१४ पूरग्रस्तांना चार कोटी ६० लाख ७० हजार रुपयांचे अनुदान वाटप पूर्ण झाले असून, अद्याप ८०० पूरग्रस्तांना अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येकांना रोखीने पाच हजार देण्यात आले, तर १0 हजार बॅँक खात्यावर जमा केले जाणार आहेत.
यापुढे महापुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन केले जाणार असून, त्याची जबाबदारी कोल्हापूर महानगरपालिकेचे उपशहर अभियंता रमेश मस्कर यांच्याकडे देण्यात आली असून, त्यांना आयकर विभाग, जीएसटीचे कर्मचारी देण्यात आले आहेत.
महापुरामुळे १0 हजारांवर कुटुंबे बाधित झाली असून, सर्वांचेच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. औद्योगिक वसाहतीतील १७ उद्योजकांची न भरून निघणारी हानी झाली आहे. प्रत्येक पूरग्रस्तांना कमीत कमी ५0 हजारांपासून ते ३0-४0 लाखांपर्यंत पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. अनेक कुटुंबांच्या घरातील टी. व्ही. फ्रीज, वॉशिंगमशिन, इलेक्ट्रीक उपकरणे, गाद्या, संसारोपयोगी साहित्य नष्ट झाले.
पूर ओसरल्यानंतर महसूल विभागातर्फे शहरातील ८५७९ पूरग्रस्त कुटुंबांना १0 किलो तांदूळ व १0 किलो गहू देण्यात आला, तर सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने ६७७७ पूरग्रस्तांना २३ प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले. ज्यांची पूर्ण घरे पडली, त्यांना प्रत्येकी ९५ हजार १०० रुपये, तर ज्यांची अंशत: घरे पडली, त्यांना प्रत्येकी ३० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.
महापुरात झालेली हानी
- अंशत: पडलेली घरे-२७५
- पूर्णत: पडलेली घरे-४०
- पूरबाधित व्यावसायिक दुकानांची संख्या-२२०८
- पूरबाधित कारागीरांची संख्या- ४१३
- पूरबाधित उद्योजकांची संख्या- १७
महापुरामुळे शहरातील कुटुंबे, व्यावसायिक, उद्योजक यांचे झालेले नुकसान मोठ्या प्रमाणात असून, त्याचे मूल्यांकन सुरू झाले आहे. तातडीची मदत म्हणून पंचनामे करतेवेळी प्रत्येकी पाच हजार रुपये, तसेच धान्यवाटप केले.
- संतोष भोर, उपायुक्त
पुणे महानगरपालिका