‘नगरोत्थान’चा आयुक्तांकडून पंचनामा
By admin | Published: January 8, 2015 12:13 AM2015-01-08T00:13:36+5:302015-01-09T00:07:53+5:30
रहदारीच्या रस्त्यांंना प्राधान्य : निकृष्ट कामे करणाऱ्यांना अद्दल
कोल्हापूर : शहरात पावणेदोनशे कोटी रुपयांच्या सुरू असलेल्या नगरोत्थान योजनेतील रस्ते व पावसाळी पाणी नियोजन कामाच्या सद्य:स्थितीबाबत आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी आज, बुधवारी आढावा बैठक घेतली. मोठ्या प्रमाणात रहदारी असलेल्या रस्त्यांची प्राधान्याने डांबरीकरणासह सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. यावेळी ठेकेदारांसह महापालिकेचे सर्वच अधिकारी उपस्थित होते.राजारामपुरीच्या मुख्य रस्त्यावरील पावसाळी पाण्याच्या निर्गतीसह युटिलिटी शिफ्टिंगची कामे त्वरित व दर्जेदार करण्याबाबत आर. ई. इन्फ्राच्या प्रतिनिधींना सक्त सूचना देण्यात आल्या. आयसोलेशन रुग्णालय ते गोकुळ हॉटेल दरम्यानच्या रस्त्याचे ठेकेदार शिवपार्वती कन्स्ट्रक्शन हे पावसाळ्याच्या पाणी नियोजनासाठी निकृष्ट दर्जाच्या पाईप वापरत असल्याबाबत आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. निविदेत ठरल्याप्रमाणेच पाईप वापराव्या लागतील, अशी सक्त सूचना ठेकेदारास करून याबाबत नोटीसही बजावण्याचे आदेश आयुक्तांनी बैठकीत दिले.
नगरोत्थान योजनेतील रस्त्यांची कामे लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची ग्वाही सर्वच ठेकेदारांनी दिली.
आयुक्तांनी सर्वच बाजूंची उलटतपासणी करीत कामाच्या दर्जाबाबत आग्रही असल्याचे स्पष्ट केले. आयुक्तांनी कामातील दर्जाबाबत तडजोड केल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदार यांची गय केली जाणार नाही, असे स्पष्ट बजावले. आयुक्तांनी घेतलेल्या झाडाझडतीमुळे ठेकेदार व अधिकाऱ्यांची गाळण उडाली.
यावेळी नूतन कार्यकारी अभियंता एस. के. माने, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, सहायक अभियंता एन. एस. पाटील, आदींसह ठेकेदार उपस्थित होते. (प्रतिनिधी)