उद्ध्वस्त पंचगंगा काठ अन् उभारीची जिद्द !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:59 AM2019-08-22T00:59:43+5:302019-08-22T00:59:47+5:30
पोपट पवार । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ज्या पाण्यावर शेतीची श्रीमंती जोपासली, त्याच पाण्यानं शेतीवर घाला घातला अन् ...
पोपट पवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ज्या पाण्यावर शेतीची श्रीमंती जोपासली, त्याच पाण्यानं शेतीवर घाला घातला अन् उदास झालेल्या शेतकऱ्यानं शेतशिवाराकडं पाठ केली...गावोगावचे ‘पार’ सुन्न झाले...चावडीवरचा दिवाही पेटेनासा झाला... हे चित्र होतं बाराही महिने हिरवा शालू नेसून सोनं पिकविणाºया पंचगंगाकाठच्या शेतशिवाराचं... ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने महापुरानंतरच्या पंचगंगा काठावरचा धांडोळा घेतला अन् गावोगावचं भयाण वास्तव समोर आलं.
इंगळी, पंचगंगेच्या काठावरच वसलेलं गाव. उसाच्या शेतीवरच १०० टक्के अर्थकारण करणाºया या गावची कळा महापुराच्या लाटेनंतर पुरती बदलली आहे. एरव्ही सतत गजबजून जाणारा येथील मुख्य चौकही सुनासुना होता. यावेळी पुराच्या पाण्यात घर पडल्याने भविष्याची चिंता वाहणाºया महादेव लोंढे या मजुराला गाठलं. एक गुंठाही क्षेत्र नाही. मात्र, गेल्या ३५ वर्षांपासून मोलमजुरी करत पै-पै जमवून घर उभारणाºया महादेवला घराच्या पडक्या भिंती दाखवताना गलबलून आलं. ‘तलाठ्यानं पंचनामे केलेत, पण मदत कवा मिळायची’, असा भावनाशून्य सवाल विचारत तो चिंताक्रांत झाला.
महेश बिरांजे, कृष्णा बिरांजे या हातावरचं पोट असणाºया मजुरांची घरेही महापुराच्या तडाख्यातून वाचली नाहीत. इंगळी-रुईच्या वाटेवर शोभा जाधव ही शेतकरी महिला भेटली. महापुरानं राहतं छप्पर विस्कटल्याने ते सावरताना तिची दमछाक होत असली तरी यातून पुन्हा सावरण्याचं बळ तिच्या देहबोलीतून दिसून आलं. महापुराच्या पाण्याने शिवारातला दीड एकरावरचा ऊस पिवळाधमक पडत चालल्याने तिच्या जिवाची घालमेल थांबत नव्हती. पडक्या घरासह शेतीच्या नुकसानीची भरपाई मिळेल, या आशेनेच ती आलेला दिवस ढकलत आहे.
इंगळी येथील मातंग वसाहतीत झोपडीवजा घरात राहणारी शालाबाई रामकू मोरे. त्या म्हणतात, ‘ नवºयाचं ३० वर्षांपूर्वी निधन झालंय. मोठ्या संघर्षातून दोन्ही मुलांना शिकविलं. मोठा १९८६ मध्ये बी. कॉम झाला. पैसे भरले नाहीत म्हणून नोकरी मिळाली नाही. विपन्नावस्थेत त्यानं जग सोडलं. धाकटा सात वर्षांपूर्वी अपघातात गेला. एक सून व दोन लहान नातवंडे झोपडीत राहतात. म्हापुरानं किडूक-मिडूक नेलं, भिताडही पाडली. आता मी इथं कशी राहायची?, काय खायची? मुलगा असता तर काय तरी केलं असतं, आता यातून आम्हाला तारलसा तर तुम्हीच’, असं सांगताना तिच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. मोठ्या आशेनं पाहणारी तिची देहबोली आम्हालाही निरुत्तर करून गेली.
रुई गावची अवस्थाही यापेक्षा काही वेगळी नाही. अगदी हाकेच्या अंतरावरून वाहणारी पंचगंगा थेट आपल्या दारात येईल, शेतीवाडी नष्ट करेल याची पुसटशी कल्पनाही नसणाºया रुईत महापुराच्या पाण्यानं आठ दिवस मुक्काम ठोकला होता. अकरा-बारा हजार लोकसंख्येचं रुई तसं या पंचक्रोशीतील सधन गाव; पण जलप्रलयाने ही सधनता पार लयाला गेली आहे. आपल्या चार एकरांच्या वावरात उसाची आधुनिक शेती करणारे कुबेर अपराधही महापुराच्या तडाख्याने पुरते खचले आहेत. तीन-साडेतीन लाख रुपयांचा खर्च करून उसाचा आदर्श मळा फुलविणाºया अपराध यांच्या उसात तब्बल बारा दिवस महापुराच्या पाण्याने तळ ठोकला होता. त्यामुळे उसाचं एक कांडंही हाताला लागणार नसल्यानं चिंताग्रस्त झालेल्या अपराध यांना आता सोसायटीचं कर्ज कसं फेडायचं या विवंचनेनं ग्रासलं आहे. न चुकता पंढरीची वारी करणाºया अपराध यांनी, ‘आमचं गाव या महापुरानं दहा वर्षे मागं नेलं आहे, त्यामुळे आता सरकारनेच आम्हाला मदत देऊन पुन्हा उभं करावं,’ अशी आस धरली आहे.
अशोक कमलाकर हेही असेच एक धडपडे शेतकरी. दोन एकरांवर गुजराण करणाºया कमलाकर कुटुंबावरही या महापुरानं संक्रांत ओढवली आहे. दोन एकरांवरील ऊस पुरानं गिळंकृत केल्यानं पीक कर्ज फेडायचं कसं? कुटुंबाचा राहटगाडा चालवायचा कसा? याची भ्रांत लागून राहिली आहे. युवा प्रगतशील शेतकरी असलेल्या सिराज पठाण यांनी पहिल्यांदाच मिरचीचा प्रयोग केला होता. ४० हजार रुपये खर्चून मोठ्या आशेनं पिक वाढवलं होतं. हातातोंडाला आलेलं पीक एका रात्रीत पाण्यात बुडून गेलं. पिकावरील कोणत्याही रोगराईलाही माग हटविणारा मी या महापुरानं हतबल झालो आहे असे सांगताना वाटणारी खंत सिराज यांच्या चेहºयावर लपत नव्हती.
पंचगंगेच्या पाण्यानं अख्ख्या शिरढोणला वेढा दिल्यानं शेतीसह अनेक घरेही पाण्याखाली गेली होती. सैरभैर झालेले शिरढोणवासीय महापूर ओसरल्यानंतर घरांची पडझड बघून पूर्ण खचून गेले आहेत. हातात पैसे नाहीत. पुराच्या पाण्याने बँकाही बुडाल्याने त्या एक सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. सरकार पैसे कधी देणार आणि आम्ही घरांची डागडुजी कधी करणार, या चिंतेने ते ग्रासले आहेत.
चार एकरांवर हळदीचं पीक घेणारे सिद्धगौंडा पाटील असोत, की दोन एकरांवर उत्कृष्ट उसाचे उत्पादन घेणारे एकनाथ यादव असोत, महापुरानं त्यांच्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा केला आहे.
मूळचे नांदणीचे, मात्र कुरुंदवाड हद्दीत प्रयोगशील शेतीचा आदर्श नमुना उभा करणारे सुभाष टारे हे लढवय्या शेतकरीही महापुराच्या तडाख्याने गर्भगळीत झाले आहेत. १२ एकर उसाचं क्षेत्र पाण्याखाली गेल्यानं टारे यांच्या डोळ्यासमोर सोसायटी आणि बँकांच्या कर्जांचा डोंगर पिंगा घालतोय. सरकारने यातून आम्हाला सावरायला हवं, असे सांगताना त्यांच्या डोळ्यांत अश्रूंचा महापूर साठला होता. देवगौंडा आणि बाबगौंडा पाटील या दोन बंधूंची प्रयोगशील शेतीची वाटही महापुराने अडवलेली. शेती-मातीशी प्रामाणिक राहत दिवस उगवल्यापासून मावळेपर्यंत शेतीत राबणारे त्यांचे हात आता मात्र शेतीकडे यायलाही धजावत नाहीत. पाटील बंधूंचा चार एकरांवरील ऊस महापुराने कवेत घेतल्याने उत्पन्नाचे सगळेच मार्ग बंद झाले आहेत. शेतीकडे जायला मन होत नाही, असे सांगताना बाबूगौंडा पाटील यांचा आवाज कातर होत गेला.
पंचगंगा आणि कृष्णा नदीकाठच्या अशा अनेक कर्मकथा पुराच्या शापिताने भरल्या असल्या तरी गावच्या काळ्या-पांढºया मातीचं संपन्नतेकडून डबघाईकडे सरकू लागलेलं रूप विषण्ण करणारं आहे. अनेक शेतकरी शेतीच्या संकटाने उद्ध्वस्त झाले असले तरी या संकटातून पुन्हा उभारी घेण्याची जिद्द बाळगूनच नव्या आव्हानांना सामोरे जात आहेत. त्यामुळे उद्ध्वस्त खेडी सावरायला हवीत.. वैराण रानं पुन्हा बहरायला हवीत...