पंचायत राज समितीकडून मुख्यालयाची तपासणी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:43 AM2021-03-04T04:43:47+5:302021-03-04T04:43:47+5:30
कोल्हापूर : यशवंत पंचायत राज अभियानअंतर्गत मूल्यांकनासाठी आलेल्या राज्यस्तरीय समितीने मंगळवारी दिवसभर जिल्हा परिषद मुख्यालयातील दप्तर तपासणीसह कामकाजाचा आढावा ...
कोल्हापूर : यशवंत पंचायत राज अभियानअंतर्गत मूल्यांकनासाठी आलेल्या राज्यस्तरीय समितीने मंगळवारी दिवसभर जिल्हा परिषद मुख्यालयातील दप्तर तपासणीसह कामकाजाचा आढावा घेतला. दोन सदस्यीय समिती आज, बुधवारी कागल पंचायत समितीची तपासणी करणार आहे.
यशवंत पंचायत अभियानात कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती पुणे विभागात प्रथम आल्याने ती राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. राज्यस्तरासाठीचे मूल्यांकन करण्यासाठी शासनाने औरंगाबाद विभागीय उपायुक्त विकास डॉ. अविनाश गोटे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे, विस्तार अधिकारी एच. बी. कहाटे, ग्रामविकास अधिकारी जी. एस. गायकवाड यांची समिती नियुक्त केली आहे.
ही समिती सोमवारी रात्री कोल्हापुरात दाखल झाली. सकाळी मुख्यालयात आल्यानंतर स्थायी समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. समिती सदस्यांचे स्वागत जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी जिल्हा परिषदेच्या वतीने केले. यानंतर आढावा घेताना सर्व विभागांचे दप्तर तपासले. सभांचे कामकाज कसे चालते, विशेषत: महिला सदस्यांकडून उपस्थित केले जाणारे प्रश्न आणि त्यांचा सभेतील प्रत्यक्षातील सहभाग, अभिलेखा वर्गीकरण, नावीन्यपूर्ण योजना, स्वच्छता, कर्मचारी व अभ्यागतांचे होणारे समाधान याबाबींची सखाेल माहिती घेतली.
मुख्यालयाची तपासणी पूर्ण झाल्यानंतर समिती शासकीय विश्रामगृहाकडे रवाना झाली. आज, बुधवारी कागल पंचायत समितीची दिवसभर तपासणी होणार आहे. यानंतर ही समिती विभागीय आयुक्तांकडे अहवाल देणार आहे. विभागीय आयुक्त राज्याच्या ग्रामविकास विभागाकडे आपला अहवाल पाठवतील, त्यानंतर राज्यातील प्रथम क्रमांकाची जिल्हा परिषद निवडीची घोषणा होणार आहे. यासाठी साधारण दोन महिन्यांचा कालावधी जाणार आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेने यापूर्वी हा पुरस्कार सलग तीन वेळा पटकावला आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत मात्र काहीशी घसरण झाली असून, यावर्षी हा पुरस्कार मिळवायचाच असा चंग बांधून जिल्हा परिषदेने तशी तयारी केली आहे. आजच्या सादरीकरणात तसाच सकारात्मक सूर दिसत होता.